बबन इंगळे
अकोला : 'दया करा काही, कसायाला विकू नका गायी', या परिवर्तनशील संदेशामुळे आज अनेक पशुपालक व गोशाळा संस्थापक गोवंशाचे पालन पोषण व संरक्षणाची जबाबदारी स्वीकारून आहेत. परंतु, सद्यःस्थितीत बार्शीटाकळी तालुक्यात चाराटंचाई असल्याने गोरक्षण चालविणाऱ्यांना फार मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे.
अनेकवेळा छुप्या मार्गाने कत्तलीकरिता जाणारे गोवंश पोलिस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे जप्त करून देखभाल व संरक्षणाकरिता गोरक्षण संस्थामध्ये आणून सोडतात. मात्र सध्या चारा टंचाईमुळे गोवंशावर उपासमारीची वेळा आली असून, शासनाकडे चारा छावण्याची मागणी करूनही गेल्या दोन वर्षांपासून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. ग्रामीण भागात गोशाळा चालकांनी शेतकऱ्यांना कडबा, कुटार, कुट्टी, आदी चारा उपासमारीने भेडसावणाऱ्या गोवंशांना देण्याचे जणू आवाहनच केले आहे.
जनावरांसाठी शासनाची नाहक दिरंगाई
यंदा पाऊसपाणी कमी असल्याने पाणीटंचाईसह चारा टंचाईचा प्रश्न उभा ठाकला आहे. ही बाब लक्षात घेऊन गोशाळा प्रमुखांनी शासनाच्या संबंधित यंत्रणेला पत्र लिहून चारा छावण्याची मागणी केली. पुणे येथील महाराष्ट्र गोसेवा आयोगाने अकोला जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे मदत व पुनर्वसन विभागाकडून चारा टंचाई निवारण्यासाठी उपाययोजना करण्याचे सुचविले. परंतु, यावर कोणतीही कार्यवाही प्रशासनाकडून होताना दिसत नाही.
जनावरांची विक्री वाढली!
गेल्या दोन-तीन वर्षांपासून बार्शीटाकळी तालुक्यात जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण -. होत आहे. परिणामी, अनेक पशुपालक आपल्या मालकीची गायी, म्हैस, ओढकाम करणारे बैल आदी जनावरे विक्रीसाठी बाजारात नेताना दिसतात, तर काही पशुपालक पालनपोषण करणाऱ्यांना व गोरक्षणला मोफत दान देत आहेत.
शासनाकडे गोरक्षणमधील जनावरांकरिता चारा छावण्या उभारण्याची मागणी केली. चारा टंचाईमुळे जनावरांवर उपासमारीचे संकट येऊ नये, या हेतूने अकोला जिल्ह्यातील नोंदणीकृत गोरक्षण संस्थेमध्ये असणाऱ्या गोवंशासह इतर जनावरांकरिता चाऱ्याचे नियोजन करण्यासाठी पत्राद्वारे सुचविले. परंतु, अद्यापही याबाबत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.- रामराव चव्हाण, गोरक्षण संस्थाप्रमुख काजळेश्वर ता. बार्शीटाकळी
सध्या गोरक्षणमध्ये असणाऱ्या गोवंशाचे पालनपोषण करण्यासाठी संस्थाचालकांना फार मोठी कसरत करावी लागढ़ आहे. भीषण चाराटंचाईमुळे उपासमारीची वेळ आली आहे. इतकेच नव्हे तर चाऱ्यासाठी गोवंशांना भटकावे लागत आहे. शासनाने चारा टंचाई दूर करण्यासाठी नियोजन करून चारा उपलब्ध करून द्यावा. - - सचिन गालट, प्रमुख आदिशक्ती गोसंधान केंद्र, धाबा राजनखेड