Join us

जनावरांमधील आजारांचे चार तासात होणार निदान, संगमेनर दूध संघाचा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 2:35 PM

जनावरांमधील आजारांचे अचूक निदान होण्याकरिता 'आरटी-पीसीआर टेस्ट केल्या जाणार आहेत.

अहमदनगर : जनावरांमधील संसर्गजन्य आजार झपाट्याने पसरतात. त्यामुळे जनावरांमधील आजारांचे अचूक निदान होण्याकरिता संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक आणि प्रक्रिया संघाकडून अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित 'आरटी-पीसीआर टेस्ट केल्या जाणार आहेत. यामुळे अवघ्या चारच तासांत जनवरांमधील आजाराचे निदान होणार आहे. महत्वाचे म्हणजे राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग असल्याचे बोलले जात आहे. 

राज्य पातळीवरील सहकारी आणि खासगी दूध संघांमध्ये पहिल्यांदा संगमनेर तालुका सहकारी दूध संघात हा प्रयोग राबविण्यात येत असल्याचे दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी सांगितले. दुभती जनावरे आजारी असताना दूध उत्पादन क्षमतेवर त्याचा परिणाम होतो. आजारांवरील उपचारांचा खर्च अधिक असतो. अशावेळी आजाराचे योग्य निदान न झाल्यास काही कालावधीनंतर जनावरे उपचारांना प्रतिसाद देत नाहीत. पाश्चिमात्य देशांमध्ये जनावरांमधील आजारांचे योग्य निदान होण्याकरिता रिअल टाइम पीसीआर म्हणजेच 'आरटी- पीसीआर टेस्ट केल्या जातात. राज्यात पहिल्यांदा संगमनेर तालुक्यात आजारी जनावरांच्या या टेस्ट होत आहेत.

टेस्टसाठी दिली जाणार किट

'आरटी-पीसीआर टेस्ट अगदीच सोपी आहे. त्याकरिता शेतकरी, पशुवैद्यक यांना किट दिली जाणार आहे. त्यात टेस्ट करण्यासाठी सर्व वैद्यकीय साहित्य असेल. आजारी जनावराच्या कानाच्या शिरांतून सिरिजद्वारे रक्त घ्यायचे. या घेतलेल्या रक्त्ताचे दोन-तीन थेंब डीएनए पेपरवर टाकायचे व हा पेपर दिलेल्या पाकिटात पॅक करायचा, तो पेपर दूध संघातील प्रयोगशाळेत पाठवल्यानंतर अद्ययावत मशिनरींद्वारे तपासणी होऊन जनावरांना कोणत्या आजाराची लागण झाली आहे, त्याचे अवघ्या चार तासांमध्ये निदान होऊन त्या पद्धतीने उपचार करणे सोपे ठरेल. तसेच दुधाचे दोन थेंब घेऊन डीएनए पेपरवर टाकायचे, त्यातून दुभत्या जनावरांच्या मास्टिटिस आजाराचे निदान होईल.

दुधाच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम

राजहंस पशुरोग निदान प्रयोगशाळा आणि क्वेंचर बायोटेक प्रयोगशाळा यांच्यात करार झाला आहे. जनावरांमधील आजारांचे अचूक निदानासाठी ही टेस्ट विकसित केली आहे. आपल्याकडे दुभत्या जनावरांमध्ये थेलेरिवासिस, बेबेसिओसिस, अॅनाप्लाज्मोसिस, दिपॅनोसोमियासिस, मास्टिटिस या आजारांची लक्षणे आढळून येतात. या लक्षणांमध्ये जनावरांना ताप येणे, लाल रक्तपेशी सुटतात तसेच आरोग्य खालावते. दुधाच्या उत्पादन क्षमतेवर त्याचा परिणाम होतो. सध्याचे निदान रक्त तपासणीवर आधारित आहे. परंतु, त्यात अचूकता नाही. आजारांचे योग्य निदान होण्याकरिता 'आरटी-पीसीआर टेस्ट उपयुक्त ठरतील, असेही देशमुख यांनी सांगितले.

पशुपालकांसाठी उपयुक्त 

अहमदनगर जिल्ह्याचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिघे म्हणाले की, अलीकडे जनावरांमध्ये वाढत्या आजारामुळे पशुपालक चिंतेत आहेत. दूध संघाने अशा प्रकारची मोहीम सुरु केल्यास फायदेशीर ठरेल. या तपासणीसाठी प्रति जनावरे सातशे रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार आहे. यात मुख्यत्वे खर्चही वाचतो... वेळही वाचतो... रक्तपेशींचे आजार, कासेचा दाह या आजारांसाठी टेस्ट उपयुक्त ठरणार आहे. रक्तपेशींच्या आजारात जनावरे दगावण्याचे प्रमाण अधिक असते. अशावेळी या चाचण्यांना खर्चही अधिक असतो. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे या आरटीपीसीआर चाचणीद्वारे सोयीस्कर होणार आहे.. 

टॅग्स :शेतीदुग्धव्यवसायशेतकरीअहमदनगरगाय