जळगाव : गायीच्या दुधाचे खरेदी दर प्रतिलिटर २८ रुपये असून राज्य शासनाने नुकतेच प्रतिलिटर ७ रुपये अनुदान (Milk Subsidy) जाहीर केले आहे; मात्र जिल्हा दूध संघाने ३० रुपये प्रतिलिटर हा खरेदीदर कायम ठेवल्याने जिल्ह्यातील दूध उत्पादकांना प्रतिलिटर दोन रुपये जास्त मिळणार आहे. संघाकडे दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी ३७ रुपये प्रतिलिटर असा भाव मिळणार आहे.
दूध संघाकडे नियमित व अनियमित दूध घालणाऱ्या (milk farmer) २८ हजार उत्पादकांच्या खात्यात दूध दरातील फरकाची ४ कोटी ६२ लाख रुपयांची रक्कमही दसऱ्यापूर्वीच जमा करण्याचे आदेश दूध संघाचे अध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी दिले आहेत. याबाबतची माहिती कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांनी मंगळवारी 'लोकमत'ला दिली. शासनाने पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.
तर उत्पादकांना प्रतिलिटर दर हे ३५ रुपये मिळणार असून ते १ ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. दरम्यान जिल्हा दूध संघ मात्र गायीचे दूध ३० रुपये प्रतिलिटरने खरेदी करीत असून ७ रुपये अनुदानामुळे हे दर ३७ रुपये प्रतिलिटर असे झाले आहेत. म्हणजेच इतर दूध उत्पादक संघाकडून मिळणाऱ्या दुधाच्या दरापेक्षा हे दर दोन रुपयांनी जास्त आहेत.
संघामार्फत १ ऑक्टोबरपासून गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३७ रुपये भाव दिला जात आहे. भाव फरकाची रक्कमही दसऱ्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. - शैलेश मोरखडे, कार्यकारी संचालक, जिल्हा दूध संघ, जळगाव
१६ उत्पादकांना थेट फायदा
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनुदान प्रतिलिटर ७ रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे उत्पादकांना प्रतिलिटर दर हे ३५ रुपये मिळणार आहे. ते दर १ ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. जिल्हा दूध संघ मात्र गायीचे दूध ३० रुपये प्रतिलिटरने खरेदी करीत असून ७ रुपये अनुदानामुळे हे दर ३७ रुपये प्रतिलिटर असे झाले आहेत. इतर दूध उत्पादक संघ व संस्थांच्या तुलनेत जिल्हा दूध संघाकडून प्रतिलिटर दोन रुपये जास्त दिले जात आहेत. याचा थेट फायदा गायीचा दूध पुरवठा संघाकडे नियमित करणाऱ्या १६ हजार शेतकऱ्यांना होणार आहे.