Join us

Goat Farming Disease : शेळ्यांतील रक्ती हगवण, लाल लघवी आजारावर उपचार काय? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 21:12 IST

Goat Farming Disease : शेळ्यांची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर अनेक आजारांना (Goat Farming Disease) सामोरे जावे लागते.

Goat Farming Disease : शेळ्यांची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर अनेक आजारांना (Goat Farming Disease) सामोरे जावे लागते. त्यातही शेळ्यांच्या निवाऱ्याची जागा जर ओलसर राहिली तर आजारांना आमंत्रण दिलेच म्हणून समजा. कारण ओलसर जागेत एकपेशीय जंतूंची वाढ होत असते. याचा परिणाम शेळ्यांवर दिसून येतो. या एकपेशीय जंतूपासून (Unicellular organisms)  कोणते आजार होतात? यावर प्रतिबंध कसा करावा, हे जाणून घेऊयात.... 

अ) रक्ती हगवण :

  • हा आजार लहान करडांमध्ये मोठया प्रमाणावर दिसून येतो. 
  • या एकपेशीय जंतुंची वाढ ओलसर जागी होते. म्हणुन या आजाराचा प्रादुर्भाव मुख्यतः पावसाळ्यात अधिक होतो. 
  • दुषित पाणी व चारा यामुळे याचा प्रसार होतो. 
  • या जंतुमुळे पचन संस्थेच्या पेशींची तसेच रक्तवाहीन्यांची हानी होते. त्यामुळे त्या फुटून शेळ्यांना पातळ जूलाब होऊन रक्ती हगवण होते. 
  • शेळ्यांचे वजन कमी होऊन त्या मृत्यु पावतात. या रोगाचे योग्य निदान व औषधोपचार पशुवैदयकाच्या सल्ल्यानुसार करून घ्यावा. 
  • तसेच प्रतिबंधक उपाय म्हणुन शेळया बांधण्याची जागा स्वच्छ ठेवावी.

 

ब) लाल लघवीचा आजार (Babesiosis) :

  • गोचिडामार्फत या आजाराची लागण होते, आजारात जोराचा १०५ ते १०६० एवढा ताप येतो. 
  • लघवी लाल अथवा कॉफीच्या रंगाची होते. 
  • जनावरे चरणे, पाणी पिणे थांबवितात, पशुवैदयकाच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार करून घ्यावेत व गोचिड प्रतिबंधक उपयायोजना करावी.

 

क) सर्रा (Trypanosomiasis) :

  • चावणाऱ्या माशांमार्फत या एकपेशी जंतुचा प्रसार होऊन रोगाची लागण होते. 
  • पावसाळ्यात माशांचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात आढळते. 
  • शेळ्यांना अधिकचा ताप येतो. 
  • बाधित जनावरांना चक्कर येते म्हणून या आजारात चक्री रोग असेही म्हटले जाते. 
  • जनावरे मृत्युमुखी पडून नुकसान होते. 
  • पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार करून घ्यावेत. 
  • तसेच गोचीड व माशांचा प्रतिबंध करावा.

- डॉ. सचिन टेकाडे, महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ, नाशिक 

टॅग्स :शेळीपालनशेती क्षेत्रशेतीकृषी योजनादुग्धव्यवसाय