Goat Farming : नुकत्याच जन्मलेल्या करडांच्या (Goat Baby) अंगास चिकट स्त्राव चिकटलेला असतो. बहुतेक वेळा शेळया करडांना चाटतात. त्यामुळे त्यांचा श्वासोच्छवास व रक्ताभिसरण क्रियांना चालना मिळते. करडू जन्मल्यानंतर २ तासांच्या आत चिक पाजला पाजावा. चिकामध्ये प्रथिने, जिवणसत्वे व खनिजे यांचे प्रमाण जास्त असते.
तसेच चिकात रोगप्रतीकारशक्ती भरपूर असते त्यामुळे ३ दिवस चिक दररोज ३ वेळा पाजावा. त्यांना दैनिक आहाराच्या गरजेनुसार दुध पाजावे. करडू जन्मल्यानंतर त्याची नाळ बेंबीपासून २.५ से.मी. अंतरावर निर्जंतुक धारदार ब्लेडने किंवा कात्रीने कापावी व ती आयोडिनमध्ये बुडविलेल्या दोऱ्याने घट्ट बांधावी. यासह करडांचे संगोपन करताना काय-काय काळजी घ्यावी, हे पाहुयात...
करडांचे संगोपन -
- करडांची राहण्याची जागा स्वच्छ, कोरडी, हवेशीर असावी.
- करडांना औषध दुधात घालून पाजू नये.
- करडांना स्वच्छ, ताजे पाणी मुबलक प्रमाणात द्यावे.
- गोठ्यात क्षारयुक्त विटांचे चाटण ठेवावे.
- हिवाळयात जन्मलेल्या करडांना थंडीपासून योग्य संरक्षण मिळण्यासाठी व्यवस्था करावी.
- जमिनीवर पाला पाचोळा किंवा भाताचा पेंढा पसरावा तसेच जाळीवर रिकामी पोती बांधावी.
- रात्रीच्या वेळी करडांच्या खोलीत १०० वॅटचा दिवा लावावा.
- करडे १० दिवसांची झाल्यानंतर त्यांना खनिज मिश्रण सुरू करावे.
- करडे १५ दिवसांची झाल्यानंतर त्यांना झाडांची कोवळी पाने किंवा हिरवा लुसलुशीत चारा देण्यास सुरूवात करावा.
- करडांना मोकळी हवा व भरपूर सुर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे.
- करडांचे वय १ महिन्याचे झाल्यावर जंतप्रतिबंधक औषधे पाजावीत.
- करडांना ३ महिने झाल्यावर ई.टी.व्ही. ची लस टोचून द्यावी, बुस्टर डोस १४ दिवसांनी द्यावा.
- करडांना शेळीला पाजण्यापूर्वी सडे स्वच्छ करावेत.
- तिसऱ्या आठवडयापासून कमीत कमी १८ टक्के प्रथिनेयुक्त पशुखाद्य व कुट्टी केलेला हिरवा चारा सुरू करावा.
- तीन महिन्यानंतर करडांचे दुध हळूहळू तोडावे, दुध तोडल्यानंतर नर व मादी करडे वेगळी ठेवावीत.
- डॉ. सचिन टेकाडे, सहाय्यक संचालक, शेळी व मेंढी विकास महामंडळ, नाशिक