Join us

Goat Farming : शेळी व्यवसायात व्यवस्थापनाचे तंत्र महत्वाचे, नाशिक मुक्त विद्यापीठात प्रशिक्षण 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 6:56 PM

Goat Farming : नाशिकच्या मुक्त विद्यापीठ येथील कृषि विज्ञान केंद्रात ‘व्यावसायिक शेळीपालन’ याप्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Goat Farming : शेतीक्षेत्रातील बदलते वातावरण, बाजारातील शेतमालाच्या भावातील चढ-उतारामधील अनिश्चितता, यातूनच निर्माण होणारे बेभरवाशी उत्पन्न, यासर्वांचा शेतीव्यवसायावर प्रतिकुल परिणाम होत आहे. यास्तव शेतीसलग्न व मुख्य व्यवसाय म्हणून उदयास येणाऱ्या शेळीपालन या व्यवसायाच्या वृद्धीसाठी ग्रामीण युवक व शेतकऱ्यांसाठी, कृषि विज्ञान केंद्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU Nashik) येथे दि. 24-28 सप्टेंबर 2024 यादरम्यान ‘व्यावसायिक शेळीपालन’ याप्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक परिसरातील  एकूण 30 प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली. 

महाराष्ट्रामध्ये पिढ्यान-पिढ्या शेळीपालन (Goat Farming) करणारी असंख्य कुटुंबे आहेत. या लोकांकडे शेळीपालनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. परंतु, या अनुभवामध्ये रूढीप्रियता, अशाश्रीय संकल्पना, अंधश्रद्धा यांचे मिश्रण आहे. यासाठी या व्यवसायाचे व्यवस्थापन तंत्र अभ्यासुन जोपासण्याची गरज आहे. अनुभवाच्या व विज्ञानाच्या या ज्ञानगंगेतून शाश्वत शेळीपालन व्यवसाय वाढीसाठी संधी असल्याचे यावेळी कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी सांगितले.

एकूण पाच दिवसीय प्रशिक्षणात शेळ्यांसाठी आहार व निवारा व्यवस्थापन, प्रसुतीशास्र व नवजात पिलांचे व्यवस्थापन, शेळ्यांचे विविध आजार व त्यांवरील प्रतिबंधात्मक उपाय, विपणन व्यवस्थापन तसेच शेळीपालनासाठी बँक अर्थसहाय्य व यशस्वी शेळीपालकांकडे प्रशिक्षनार्थींचा अभ्यासदौरा या शेलीपालानासाठी आवश्यक विविध विषयांचा समावेश करण्यात आला होता. 

कृषी विज्ञान केंद्राचे पशुवैद्यकशास्र विशेषज्ञ डॉ. श्याम कडूस-पाटील यांनी प्रशिक्षणाचे समन्वयन व सूत्रसंचालन केले. कृषी विज्ञान केंद्र प्रमुख व वरिष्ठ शास्रज्ञ डॉ. नितीन ठोके यांनी प्रास्ताविक करत, कृषी विज्ञान केंद्राच्या यशस्वी शेळीपालकांची व्यवसायपद्धती विषद केली. कार्यक्रमासाठी केंद्राचे कृषी अभियंता राजाराम पाटील, उद्यानविद्या तज्ञ हेमराज राजपूत, मृदा तज्ञ मंगेश व्यवहारे, हर्शल काळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :शेती क्षेत्रशेळीपालनशेतीनाशिक