Open Goat Farming : शेळी पालनातील (Sheli Palan) मुक्त व्यवस्थापन पध्दतीमध्ये मिश्र कळपामध्ये इतर पाळीव प्राण्यासोबत नैसर्गिक पडीक, नापिक जमिनीवर उगवलेल्या गवतावर, झाडपाल्यावर, चराऊ कुरणावर, धान्य पिकाच्या अवशेषावर जोपासल्या जातात. यामध्ये चराऊ कुरणावरील झाडाच्या सावलीचा, नदी, नाले आणि तळ्यातील पाण्याचा उपयोग करुन घेतला जातो.
साधारण ही पद्धत अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, आर्थिक दुर्बल घटकातील लोक पारंपारिक स्वतंत्र्य पशु व्यवसाय (Milk Business) आणि उत्पन्नाचे प्रमुख साधन म्हणून मुक्त व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करतात. कारण शेतकऱ्याची आर्थिक दुर्बलता, अत्यल्प जमिन धारणा, वैरण पाण्याची कमतरता, न परवडणारी कोरडवाहू जमिन हे प्रमुख कारणे आहेत. या पध्दतींमध्ये कळपातील शेळयांची संख्या अधिक (५०-३००) असते. परंतु, भांडवली गुंतवणूक, मजूर, चारा, पाणी, औषधोपचारावरील होणारा खर्च कमी लागतो. शेळयांना व्यायाम मिळतो, खाण्याच्या आवडी-निवडी जोपासल्या जातात.
मुक्त व्यवस्थापन पद्धत
- या पध्दतीमध्ये निवारा, चारा वैरण, खुराक आणि पाण्याची वेगळी व्यवस्था केली जात नाही.
- त्यासाठी शेळ्या पुर्णपणे निसर्गावर अवलंबुन असतात.
- या पध्दतीमध्ये प्रतिकुल परिस्थितीत शेळ्यांना संरक्षण फार कमी मिळते, परंतु, अडचणीच्या काळात रात्रीच्या वेळी काटेरी फांद्यांचे कुंपण घालून उघड्यावर किंवा झाडाखाली निवाऱ्याची सोय केली जाते.
- मुक्त व्यवस्थापन पध्दत कमी पावसाच्या शिवाय उष्ण हवामानात, डोंगराळ प्रदेशात सोईस्कर आहे.
- या पध्दतीमध्ये नैसर्गिक साधन सामुग्रीचा पुरेपूर उपयोग करुन घेतला जातो.
- या पध्दतीमध्ये कुटुंबातील व्यक्तीचा व्यवस्थापनासाठी उपयोग केला जातो. त्यामुळे इतर व्यवस्थापन पध्दतीच्या तुलनेत या पध्दतीमध्ये भांडवली गुतवणूकीच्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळते.
मुक्त व्यवस्थापन पद्धतीचे तोटे
- व्यापारी तत्वावर शेळी व्यवसाय करण्यासाठी मुक्त स्थलांतर पध्दतीची शिफारस केली जात नाही.
- कारण मुक्त चराऊ कुरणावर शेळयांच्या चरण्यावर बंधन राहत नाही, लेंडीखत वाया जाऊन खताचे उत्पन्न मिळत नाही.
- शेळ्याच्या प्रजनन, आहार आणि दुध उत्पादनावर नियंत्रण ठेवता येत नाही.
- करडाच्या शरीराची वाढ खुंटते, त्यामुळे करडांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते.
- अधिक उत्पादनाची अपेक्षा करता येत नाही.
- एकंदरित आर्थिक दृष्टिने मुक्त व्यवस्थापन फायदेशिर होऊ शकत नाही.
- त्यामुळे शेळी व्यवसाय व्यापारी तत्वावर यशस्वी करण्यासाठी बंदिस्त किंवा मिश्र व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब केला पाहिजे.
मुक्त व्यवस्थापन पद्धतीचे फायदे :
- शेळया जोपासण्यासाठी रोजंदारीवरील किंवा हंगामी मजूराचा वापर केला जात नाही.
- या पध्दतीमध्ये शेळ्यांच्या निवाऱ्यावर तसेच मजूरीवर खर्च होत नाही.
- शेळ्यांना व्यायाम मिळतो.
- शेळ्या त्याच्या आवडीनुसार चारा खातात.
- डॉ. सचिन टेकाडे, सहाय्यक संचालक, महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ, नाशिक