Goat Farming Technique : शेळीपालन (Goat Farming) व्यवसायामध्ये जागेची योग्य निवड करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे खाद्यासाठी, राहण्यासाठी लागणारा खर्च वगैरेचे योग्य व्यवस्थापन होते. त्यामुळे आजच्या भागातून शेळी पालनासाठी जागेची निवड, निवारा याबाबत जाणून घेऊयात...
जागेची निवड करतांना
- शेळ्यांच्या वाड्यासांठी निवडलेली जागा वाहतुकीच्या मुख्य रस्त्यापासून सुमारे १ ते १.५ कि.मी. अंतरावर असावी.
- रस्त्याच्या अगदी जवळ असल्यास ध्वनी/वायू प्रदुषण होते. चोरीची शक्यता असते.
- याशिवाय सांसर्गिक रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
- चराऊ कुरणे तयार करण्यासाठी जागा असावी जेणेकरुन खाद्यावरील खर्च कमी होईल.
- मुबलक पाण्याची उपलब्धता असावी.
- जागा शक्यतो बाजाराजवळ असावी.
- वाड्यांची जागा उंचवट्यावर, मुरमाड आणि पाण्याचा त्वरीत निचरा होणारी असावी.
- ओलसर चिखलाची जागा दमट असल्यामुळे शेळ्यांच्या वाढीसाठी योग्य नाही.
शेळ्यांचा निवारा
1. शेळ्यांच्या वाड्यांची लांबी पूर्व पश्चिम आणि रुंदी दक्षिणोत्तर असावी.
2. शेळ्यांना लागणारी जागाः वाड्याची जमिन फरशी / सिमेंट क्रॉक्रिटची किंवा भाजलेल्या खंगर विटांचा जमिनीसाठी वापर करावा. त्यामध्ये चूना आणि १० टक्के बी.एच.सी. पावडर १०-१५ किलो टाकवी. 3. शेळ्या बोकड आणि करडांना बंदिस्त जागा आणि किमान दुप्पट जाळीच्या कुंपणाची मोकळी जागा फिरण्यासाठी आवश्यक आहे.
जसे की, करडे छताखाली 05 चौरस फूट आणि खुली 10 चौरस फूट, शेळ्यांसाठी छताखाली 10 चौरस फूट तर खूली 20 चौरस फूट, पैदाशीचा नर छताखाली 15 चौरस फूट तर खुली 30 चौरस फूट जागा आवश्यक असते.
वायुविजन
- वायुविजनामुळे गोठ्यातील उष्णता, कार्बन डायऑक्साईड, धुळ, आद्रता, रोगजंतू बाहेर काढले जाऊन त्या जागी शुध्द, ताजी हवा आत येते.
- गोठ्यामध्ये येणारी शुध्द हवा ही आत असणाऱ्या जनावरांपर्यंत पोहोचेल अशी गोठ्याची रचना असावी.
- यासाठी छपराची उंची/ आकार अत्यंत महत्वाचा असतो. इंग्रजी आकाराची मध्यावर ३ ते ३.५ मी. उंचीची छपरे चांगली.
- डॉ. सचिन टेकाडे, सहाय्यक संचालक, महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ, नाशिक