Join us

Goshala Subsidy : गोशाळांना 25 लाख रुपयापर्यंत अनुदान, कुठे आणि कसा कराल अर्ज? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 2:36 PM

Goshala Subsidy : नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यात गोवंशाचा सांभाळ करण्यासाठी गोशाळांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

नाशिक : पशुसंवर्धन विभागामार्फत सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना (Goshala Subsidy Scheme) नवीन स्वरूपात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे 15 तालुक्यात गोवंशाचा सांभाळ करण्यासाठी गोशाळांना (Goshala Subsidy) अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेसाठी इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

नाशिक जिल्ह्यातील (Nashik district) इगतपुरी, बागलाण, पेठ, सुरगाणा, सिन्नर, येवला, निफाड, दिंडोरी व चांदवड (Chandwad) या तालुक्यातील इच्छुक संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. प्रशांत धर्माधिकारी यांनी  प्रसिद्धी पत्रकान्वये केले  आहे. गोवंशाचा (भाकड गाई, अनुत्पादक, निरूपयोगी बैल, वळू इ.) सांभाळ करण्यासाठी गोशाळांना अर्थसहाय्यक करण्याकरीता ही योजना राबविण्यात येते.

यापूर्वी 2021-22 मध्ये त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) आणि 2023-24 मध्ये नाशिक, मालेगाव, कळवण, देवळा, नांदगाव या सहा तालुक्यांत प्रत्येकी एक गोशाळा याप्रमाणे निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या गोशाळेस  त्यांच्याकडे असेलेली पशुधन संख्या विचारात घेवून अनुदान वाटप करण्यास मान्यता देण्यात येणार आहे.  या योजनेंतर्गत 50 ते 100 पशुधन असलेल्या गोशाळेस रूपये 15 लक्ष, 101 ते 200 पशुधन असलेल्या गोशाळेस रूपये 20 लक्ष तर 200 पेक्षा अधिक पशुधन असलेल्या गोशाळेस रूपये 25 लाख एवढे अनुदान एकवेळेचे अर्थसहाय्य म्हणून देण्यात येणार आहे.

सदर योजनेसाठीचा अर्ज व लागणारी आवश्यक कागदपत्रे  याबाबतचा तपशिल जिल्हा पशुसंवर्धन उपआयाक्त कार्यालय नाशिक तसेच जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती स्तरावरील पशुधन विकास अधिकारी  (विस्तार) यांच्याकडे उपलब्ध आहेत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनागायशेती