Join us

Gotha Management : पावसाळ्यात जनावरांचा गोठा सुस्थितीत कसा ठेवाल? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 1:43 PM

Gotha Management : सध्या पावसाळ्याचे दिवस असून जनावरांसाठी देखील निवाऱ्याची व्यवस्था करणे आवश्यक असते.

Gotha Management : सध्या पावसाळ्याचे दिवस असून जनावरांसाठी (animal) देखील निवाऱ्याची व्यवस्था करणे आवश्यक असते. यासाठी घराला लागून जनावरांचा गोठा सुस्थितीत करून घेतला जातो. कुठे पाणी गळतंय का? जमिनीवर मुरूम टाकून सपाट करणे असो, ही कामे केली जातात. यामुळे जनावरांना देखील पावसाळ्यात (Rainy Season) सुरक्षित अशी जागा मिळते.. या काळात म्हणजे पावसाळ्यात गोठ्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक असते. ते कसे कराल, हे पाहुयात... 

गोठ्यामध्ये (Mukta Gotha) काही ठिकाणी पाणी गळत असेल तर वेळीच डागडुजी करावी. गोठ्यात हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी. गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवावी, जेणेकरून लघवी व शेणावाटे निघणारे अमोनियाए मिथेन वायूमुळे जनावरांच्या डोळ्यांना त्रास होणार नाही. वारा, थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य निवारा, गाभण गाई, म्हशींची योग्य व्यवस्था, आरामदायी व उबदार बसण्याची सुविधा तसेच शक्य तेवढे कोरडे वातावरण या काळात ठेवावे.

पावसाळ्यात जमीन ओली, भुसभुशीत झाल्यामुळे जनावर घसरून त्यांना इजा होऊ शकते. दगड व माती खुरांमध्ये जाऊन बसल्यामुळे जनावरांना जखमा होतात. यासाठी खुरांची नियमित तपासणी करावी. पावसाळ्यात ओलसरपणामुळे खूर खराब झाल्यास त्या वेदनांमुळे दुभत्या गाई, म्हशींच्या उत्पादनावर परिणाम होतो. हिरव्या चाऱ्याकरिता ज्वारी, बाजरी, मका, यासारखे पिकांना प्राधान्य द्यावे. याचबरोबर बहुवार्षिक पिकांमध्ये यशवंत, मेथीघास यासारखी पिके घ्यावीत.

पावसाळ्यातील शेळी व्यवस्थापन

पावसाळ्यामध्ये पश्चिमेकडून पाऊस व वारा वाहतो, त्यानुसार शेळ्यांचे पावसापासून संरक्षण होण्यासाठी गोठ्यात आवश्यक त्या उपाययोजना कराव्या. शेळ्यांना ठेवण्यासाठी वेगवेगळी दालने असावी ज्यामुळे आजारी शेळ्या, पिले, गाभण शेळ्या व बोकड वेगवेगळे ठेवता येतील. शेळ्यांना आवश्यक तेवढी जागा द्यावी, जेणेकरून गर्दी होणार नाही. पावसाळ्यात शेळ्यांच्या शेडच्या प्रवेशद्वाराजवळ चुना टाकावा, तसेच शेडमधील जमिनीवरही चुना भुरभुरावा.

संकलन : विभागीय संशोधन केंद्र आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतीशेती क्षेत्रशेतकरीपाऊस