Join us

उन्हापासून गायी-म्हशी, शेळ्या-कोंबड्यांचा बचाव कसा करावा, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 2:38 PM

वाढत्या उन्हात गाई, म्हशी, शेळ्या, कोंबड्या आदींची काळजी घेणे आवश्यक आहे.

उन्हाचा कडाका वाढत असून बहुतांश ठिकाणी पाणी टंचाई जाणवू लागली आहे. अशावेळी पशुधनाला देखील उन्हाचा दाह सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाढत्या उन्हात गाई, म्हशी, शेळ्या, कोंबड्या आदींची काळजी घेणे आवश्यक आहे. जेणेकरून उन्हामुळे पशुधनाला कोणतीही इजा होणार नाही, यासाठी इगतपुरी विभागीय संशोधन केंद्राने सल्ला दिला आहे. 

पशुधन

गाईपेक्षा म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो. म्हणून म्हशी माजावर येण्याचे प्रमाण बंद होते. याउलट थंड हवामान असलेल्या गोठ्यात गाईप्रमाणे म्हशीसुद्धा उन्हाळ्यातही नियमित माजावर येतात. माजावर आलेल्या म्हशी ओळखाव्यात. कारण या दिवसात त्यांच्यामध्ये माजाची लक्षणे कमी तीव्रतेची असतात. त्यामुळे दिवसातून तीन-चार वेळा निरीक्षण करावे.

कृत्रिम रेतन करावयाचे असल्यास शक्यतो, सकाळ अथवा संध्याकाळी करावे, म्हशीना डुंबण्यास द्यावे, ही त्यांची नैसर्गिक आवड आहे. त्यामुळे शरीराचे तापमान योग्य राखले जाते. म्हशींच्या अंगावर पडेल, अशी पाण्याच्या फवाऱ्याची व्यवस्था करावी, अशी व्यवस्था नसल्यास दिवसातून तीन-चार वेळा त्यांना पाण्याने धुवावे.

दुपारच्या वेळी जनावरे गोठ्यामध्ये बांधावीत. उन्हाळ्यात छपरावर गवताचे आच्छादन टाकावे, शक्य असल्यास गोठ्याच्या बाजूनी गोणपाटाचे किंवा पोत्याचे पडदे लोंबत ठेवून त्यावर पाणी फवारावे. जनावरांना पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था आवश्यक आहे, शक्य झाल्यास त्यात मीठ व गूळ टाकावे, अशा प्रकारे व्यवस्थापन केल्यास उन्हाळ्यात होणारे कमी दूध उत्पादन वाढू शकते.

शेळी

शेळ्यांच्या पुष्कळशा आजारांची लक्षणे ही सारखीच दिसतात. बऱ्याच वेळा आजारांचे योग्य निदान होण्या अगोदर शेळ्या दगावतात व इतर जवळपासची जनावरे संसर्गाने आजारी पडतात. त्यासाठी शेळ्यांना रोग झाल्यावर तो बरा करण्यापेक्षा तो होऊ न देणे अधिक चांगले, म्हणून शेळ्यांना ठरल्यावेळी रोगप्रतिबंधक लस व जंतनाशक औषध द्यावीत. तसेच शेळ्यांना गोचीड व पिसवा पापासून त्रास होऊ नये, म्हणून डेल्टामेथ्रीन हे रसायन असलेले (उदा ब्युटॉक्स) द्रावण गोठ्यात व शेळ्यांच्या अंगावर फवारावे. फऱ्या, लाळ-खुरकत, पीपीआर या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी या रोगांची लस टोचून घेणे आवश्यक आहे. शेळ्यांच्या मोठ्या कळपांसाठी दरवर्षी क्षय, जोन्स इ रोगांचे व गर्भपाताचे परीक्षण करणे आवश्यक असते आणि ज्या शेळ्या संसर्गजन्य असतील, त्यांना कळपातून काढून टाकावे.

कुक्कुटपालन

कोंबड्यांना ताण-तणावापासून सांभाळणे ही यशस्वी कुक्कुटपालनाची गुरुकिल्ली आहे. कोंबड्‌यांना अनेक कारणामुळे ताण येतो. परंतु सर्वांत जास्त प्रश्न असतो, उन्हामुळे येणारा ताण म्हणजेच हिट स्ट्रेस या ताणामुळे कोंबड्यांमध्ये मरदेखील मोठ्या प्रमाणात होते. या ताणावर (हिट स्ट्रेस) उपचार करत असताना केवळ औषधोपचार न करता संगोपनात काही बदल करणे आवश्यक आहे.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीदुग्धव्यवसायतापमानहवामान