नाशिक : जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत (Animal husbandry) पशुसंवर्धन माहिती पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागाकडून प्रारंभी या पुस्तिकेच्या २८०० प्रती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पशुधनाची काळजी कशी घ्यावी तसेच आधुनिक पद्धतीने पशुव्यवसाय कसा करावा, याबाबत या पुस्तिकेत इत्यंभूत माहिती देण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यात (Nashik District) सुमारे ८.५ लाख पशुधन आहे. एवढ्या मोठ्या संख्येने असणाऱ्या पशुधनाची काळजी, आजार-उपचार, पशुव्यवसाय (dairy Business) कसा करावा, याबाबत मार्गदर्शन करणारी ही पुस्तिका शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. जनावरांना रोग, आजार होऊ नये, यासाठी काळजी कशी घ्यावी याबाबत या पुस्तिकेत उहापोह करण्यात आला आहे. त्याचबरोबर चारा व्यवस्थापन, दूध उत्पादनासाठी आधुनिक आहार पद्धती, जनावरांमधील आम्लधर्मीय व अल्कली अपचन, कृत्रिम रेतन व वंध्यत्वाची कारणे, फॉस्फरसची कमतरता, पोटॅशियमची कमतरता, पशू प्रथमोपचार, जनावरांना होणारी विषबाधा, कारणे व उपाय, लम्पी या चर्मरोगाविषयी घ्यावयाची काळजी इत्यादि.
तसेच रक्त संक्रमण, राष्ट्रीय पशुधन अभियान, पावसाळ्यात पशुधनाची घ्यावयाची काळजी तसेच शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय योजना याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पुस्तिकेत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, पशुधन विकास आव्हाड अधिकारी डॉ. संभाजी , तालुकास्तरीय पशुधन विकास अधिकारी यांचे लेख तसेच गोपालक शेतकरी आणि दुग्ध उत्पादन वृद्धीच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे.
कुठे मिळेल पुस्तिका?
'नाशिक जिल्हा परिषद पशूसंवर्धन विभागाच्या माध्यमातून ही पशुसंवर्धन पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना पशुधनाबाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी ही पुस्तिका मार्गदर्शक ठरणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयात ही माहिती पुस्तिका उपलब्ध होणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.