Join us

Goat Management : सुदृढ करडे मिळण्यासाठी गाभण शेळीची काळजी कशी घ्याल? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 15:23 IST

Goat Management : शेळीचा गाभण अवस्थेतील (Pregnant Goat Management) शेवटचा दीड महिना व प्रत्यक्ष वेत हा अतिशय महत्त्वाचा काळ असतो.

Goat Management : शेळीचा गाभण अवस्थेतील (Pregnant Goat Management) शेवटचा दीड महिना व प्रत्यक्ष वेत हा अतिशय महत्त्वाचा काळ असतो. गर्भाची जास्तीत जास्त वजनवाढ गाभण अवस्थेतील शेवटच्या दीड महिन्यात होते. उदा. जन्मतः करडू २.५ किलो वजनाचे असेल तर त्यापैकी २ किलो वजनवाढ गर्भाशयात असताना शेवटच्या दीड महिन्याच्या काळात झालेली असते. म्हणूनच ह्या काळात शेळीला जास्तीत जास्त पौष्टिक खुराकाची गरज असते.

करडांच्या आरोग्याच्या दृष्टीने शेळीला (Goat Farming Management) पुरेसे दूध असणे आवश्यक आहे. शेळीच्या शरीरात पुरेशी चरबी असेल तर करडांसाठी पुरेसे दूध उपलब्ध होते. गाभण असताना शेळीला पौष्टिक खुराक दिल्यास तिच्या शरीरात पुरेशी चरबी साठवली जाते. शेळी विताना साठवलेल्या चरबीमधून मिळणाऱ्या ऊर्जेतून ताकद मिळते व शेळी व्यवस्थित वेणा घालू शकते. त्यामुळे विताना शेळीला त्रास होत नाही. 

शिवाय शेळी व्यायल्यानंतर करडांना पुरेसे दूध उपलब्ध होते. शेळी व्यायल्यानंतर एकदा ती दूध द्यायला लागली की पुरेसे दूध निर्माण करण्यासाठी आवश्यक तेवढे उष्मांक (कॅलरी) व प्रथिने असलेले खाद्य ती खाऊ शकेलच असे नाही. म्हणून गाभण असताना योग्य प्रमाणात पौष्टिक खाद्य देणे महत्त्वाचे आहे.

शेळी विण्यापूर्वी एक महिना अगोदर

शेळी विण्यापूर्वी एक महिना अगोदर तिला आंत्रविषार व घटसर्प ह्या लसी २.५ मि.ली. कातडीखाली टोचाव्यात. शेळीच्या चिकामधून या रोगांविरुध्दची प्रतिकारशक्ती पिल्लाला मिळते. त्यामुळे पिल्लू जन्मल्यानंतर ३ आठवडे आंत्रविषार व घटसर्प या रोगांना बळी पडत नाही. तसेच शेळ्यांना व्यायल्यानंतर जंतनाशके पाजणे अगदी जरुरीचे असते.

अंदाजे ४० किलो वजनाच्या शेळीला १५ ते १६ मि.ली. अल्बैडाझोल (Albendazole) हे जंतनाशक पाजण्यात यावे (म्हणजे प्रत्येक शेळीला तिच्या दहा किलो वजनामागे ४ मि.ली. जंतनाशक पाजावे.)

व्यायच्या आधी दोन-तीन दिवस

व्यायच्या आधी दोन-तीन दिवस शेळीला चरायला बाहेर सोडू नये. तिला बंदिस्त ठेवून खाद्य देण्यात यावे. तसेच व्यायच्या अगोदर शेळीच्या शेपटीवरील व मांडीवरील केस कात्रीने कापावेत. शेळीची कास जर खूपच मोठी झालेली असेल तर कासेला कापडाची पिशवी बांधावी ह्यामुळे कासेचे संरक्षण होऊन कासेचा दाह होणार नाही.विण्याअगोदर शेळीच्या कासेवरचे केस कापावेत. कारण दूध पीत असताना करडाच्या डोळ्यात हे केस टोचले जाऊन डोळे पांढरे होऊ शकतात व लक्षात न आल्यास करडू आंधळे देखील होऊ शकते.

-  निंबकर कृषी संशोधन संस्था (नारी)

टॅग्स :शेळीपालनशेती क्षेत्रशेतीदुग्धव्यवसाय