जळगाव : संपूर्ण जळगाव जिल्ह्यावर दुष्काळाची अवकळा व्यापून आहे. जिल्हाभर गायीच्या दुधाची धार मात्र प्रवाही आहे. त्यातुलनेत म्हशीच्या दुधाची धार आटली आहे. मध्यंतरी जिल्हा दूध संघाने प्रतिलिटर दरात वाढ केली. तर दुसरीकडे गायीच्या दूध संकलनात 10 हजार लिटरने दिलासादायक वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने जिल्ह्यात बहुतांशी भागांत दुष्काळाने मुक्काम ठोकला आहे. विशेष म्हणजे चाळीसगाव तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर झाला आहे. खरिपात शंभर टक्के नुकसानीचे पंचनामे केले गेले. तालुक्यात सद्यस्थितीत 32 गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, याचा थेट फटका पशुपालन व दूध व्यवसायाला बसला आहे.
एकीकडे दुष्काळाचा वणवा पेटला असतानाही जिल्हा दूध संघाकडे गायीच्या दुधाची धवल धार प्रतिदिन १० हजार लिटरने वाढली आहे. गेल्या महिन्यात दूध संघाकडे जिल्हाभरातून १ लाख ५० हजार लिटर दूध जमा व्हायचे. आता १ मे पासून हे संकलन १ लाख ६० हजार लिटरवर पोचले आहे. दुष्काळी स्थिती असताना प्रथमच हे संकलन वाढले असल्याचे दूध संघाच्या व्यवस्थापनाचा दावा आहे. गायीच्या दुधासोबतच म्हशीच्या दुधाचीही दरवाढ करण्यात आली मात्र तीव्र उन्हामुळे म्हशीची दूधगंगा काही अंशी आटली आहे. प्रतिदिन संकलनात ८ ते १० हजार लिटरने म्हशीचे दूध संकलन कमी झाले आहे.
दूधाचा ओघ कमी
मिल्कसिटी अशी ओळख असलेल्या चाळीसगाव तालुक्यात गंभीर दुष्काळाचे दृष्य परिणाम ठळकपणे दिसू लागले आहे. मे महिन्यात गाय व म्हशीच्या दुधात 25 टक्क्यांची घट आहे. कमालीची उष्णता यासोबतच ग्रामीण भागात निर्माण झालेल्या चारा पाणीटंचाईमुळे दुधाचा ओघ कमी झाल्याचे दूध ठोक विक्रेते जितेंद्र वाबळे यांनी सांगितले.
जिल्हा दूध संघाने १ मेपासून गाय व म्हशीच्या दूध दरात प्रतिलिटर २ रुपये ४० पैशांची वाढ केली. तर दुसरीकडे गायीच्या दुधाचे संकलन प्रतिदिन १० हजार लिटरने वाढले आहे. उन्हात म्हशीच्या दूध उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत असतो. पावसाळ्यात हे संकलन पूर्ववत होईल.
- आमदार मंगेश चव्हाण, अध्यक्ष, जिल्हा दूध संघ.
- जिजाबराव वाघ