वर्धा : पशुखाद्याचे वाढलेले दर आणि चारा टंचाईमुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहे. बाजारात मिनरल वॉटरपेक्षाही गायीचे दूध स्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी शेणाशिवाय हाती काहीच शिल्लक राहीना. भरीस भर म्हणून शासन देत असलेल्या प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाचे निकष बदलल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.
नवीन शासन निर्णयानुसार ३.३ फॅट व ८.३ एसएनएफसाठी ५ रुपये प्रतिलिटर अनुदानाचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर दोन महिन्यांनी अनुदानाचा फेरविचार केल्यानंतर १३ मार्चच्या मंत्रिमंडळ बैठकीत ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी पाच रुपये अनुदानासह केवळ २५ रुपये दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ३.५ फॅटच्या आतील दुधास पाण्यापेक्षाही कमी म्हणजेच १८ ते २० रुपये दर मिळणार आहे. तर ४ फॅट दुधासाठी केवळ २६ रुपये ५० पैसे दर मिळणार आहे. यंदा दुष्काळसदृश परिस्थिती असतानाही शेतकरी पशुधन वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. मार्चच्या मंत्रिमंडळ बैठकीत ३.५ फॅट व ८.५ साठी ३२ रुपये ५० पैसे दर मिळेल अशी अपेक्षा होती; मात्र दूध दराबाबतच्या निर्णयासंदर्भात राज्याच्या राजकीय गोंधळात राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचे दिसून येते.
चाऱ्याचा प्रश्न कायमच
आर्वी तालुक्यातील काही गवळी समाजातील दूध उत्पादकांच्या चारा व पाण्याच्या प्रश्नासाठी दूध उत्पादक आपल्या पशू व परिवाराला घेऊन ज्या ठिकाणी मुबलक पाणी व चाऱ्याची व्यवस्था आहे. तेथे स्थलांतर करतात. ज्यावेळी गावाकडे चारा आणि पाण्याची सोय होईल, तेव्हाच ते घरची वाट धरतात. दिवसेंदिवस दुधाचा भाव कमी होत चालला असून चाऱ्याचा प्रश्न दूध उत्पादकांपुढे निर्माण होत आहे. सध्या चण्याच्या कुटराला मागणी असून याचे भाव चांगलेच वाढलेले नाहेत. शेतकऱ्यांपासून पूर्वी जी गाडी कमी पैशात यायची, त्याचे रही दुपटीने मोजावे लागत बसल्याचे चित्र आहे. दर वाढल्याने चाऱ्याचा प्रश्न कायम आहे.
दवाखान्याच्या खर्चातही वाढ
ज्या ठिकाणी स्थलांतर होते, त्या ठिकाणी साधी विजेची देखील व्यवस्था नसते. त्यामुळे ज्या प्रकारे मिळेल. त्या गोष्टीतून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह सुरू असतो. त्यामुळे ज्या ठिकाणी स्थलांतर होत असते. त्या ठिकाणी प्रशासनाने काही उपाययोजना करण्याची सुद्धा मागणी आता जोर धरु लागली आहे. काही पशूच्या पोटाची खळगी भागविण्यासह मुलांच्या शिक्षणाकडे सुद्धा अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसून येत असल्याने ही बाबही गंभीरच आहे. सध्या वातावरणात बदलामुळे अनेक जनावरे आजारी पडतात. परिणामी, डॉक्टरांचा खर्च जास्त प्रमाणात असल्याने व औषधोपचार करताना पशुपालकांच्या खिशाला मोठ्या झळा बसतात. अनेक औषधी महाग असल्याने जनावरांवर औषधोपचार करणे सुद्धा कठीण होत आहे.
चाऱ्याच्या किमतीत वाढ
सध्या गायीच्या खुराकीच्या किमतीत चांगलीच वाढ झाली आहे; मात्र अद्यापही दुधाच्या भावाला योग्य तो भाव मिळत नसल्याने अनेकांनी आपला दुग्ध व्यवसाय गुंडाळण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. पशुपालकांकडून अनेकदा चाऱ्याच्या किमतीत घसरण करावी, अशी सतत मागणी होत आहे. पशुपालक सतीश शेंडे, म्हणाले की, शासनाने काही दिवसांपूर्वी अनुदान सुरू केले; मात्र हे अनुदान अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात न आल्याने व आधी दुधाला जो भाव मिळत होता. त्याचे सुद्धा दर कमी केल्याने दुग्ध व्यवसाय करणे कठीण झाले आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.