Join us

तुमच्या गायी, म्हशी, शेळ्यांचा विमा काढला का? वाचा कुणासाठी ही योजना? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 6:06 PM

पशुपालकांच्या उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन असलेल्या गायी, म्हशी, शेळ्यांचा विमा काढला जातो.

जळगाव : बळीराजाची सोबत करण्यासह पशुपालकांच्या उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन असलेल्या गायी, म्हशी, शेळ्यांचा विमा काढला जातो. त्यात आता शासकीय योजनांमधून अथवा बँकांकडून कर्ज घेत पशूधन घेतल्यास त्यासाठी विमा अनिवार्य केला आहे. पशुधन विमा योजनेचा लाभ विमा काढल्यानंतर जनावरांचा मृत्यू झाल्यास विमा कंपनी पशुधन मालकांना विम्याची रक्कम देण्यात येत आहे. 

पशुधन विमा योजना ही शेतकऱ्यांना व पशुपालकांना त्यांच्या पशुधनाच्या अकाली मृत्यूमुळे होत असलेल्या प्रासंगिक हानीपासून वाचविण्यासाठी ही विमा योजना आहे. सरकारकडून देखील अशी योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र सद्यस्थितीत हि योजना स्थगित करण्यात आली आहे. तर ही योजना मुख्यत्वे शासकीय योजनांमधून आणि बँकाकडून कर्ज काढून खरेदी केलेल्या पशुधनासाठी आहे. ही योजना रोग नियंत्रणासाठी आणि जनावरांच्या अनुवांशिक गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी अधिक प्रभावी उपाय प्रदान करण्यासाठी आणि अशा जनावरांच्या अंतिम नुकसानीपासून शेतकरी आणि पशुपालकांना खात्रीशीर संरक्षणाची यंत्रणा तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

ही योजना कुणासाठी अनिवार्य

पूर्वी केंद्र सरकारच्या योजनेनुसार विमा काढल्यानंतर विमा हप्त्याची निम्मी रक्कम सरकार जमा करत असे. मात्र आता ही योजना बंद झाली आहे. आता शासकीय योजनांमधून अथवा बँकांकडून कर्ज घेत पशूधन घेतल्यास त्यासाठी विमा अनिवार्य केला आहे. तर जनावरांच्या मृत्यूनंतर १५ दिवसांच्या आत पशुपालकांना नुकसान भरपाईची रक्कम दिली जाते. या योजनेंतर्गत प्राणी मालकांना एक वर्षासाठी विमा मिळू शकतो. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.

किमतीच्या चार टक्के हप्ता

पशुधनाची जी किमत असेल, त्याच्या चार टक्के विमा हप्ता लागतो. त्यावर जीएसटीदेखील द्यावा लागतो, विमा हप्त्याची रक्कम ही पाळीव प्राण्याचा प्रकार, वय, जात यानुसार किती प्रकारच्या रकमेचे संरक्षण हवे. यावरही ठरविली जाऊ शकते. शासकीय योजना अथवा बँकांकडून कर्ज घेऊन पशूधन खरेदी केल्यास त्यांच्यासाठी विमा अनिवार्य आहे. पूर्वी सरकारच्या योजनेनुसार प्रिमीयममध्ये ५० टक्के सूट असायची, आता ही योजना बंद असल्याचे स्पष्टीकरण पशुधन विकास अधिकारी डॉ. नीलेश चोपडे यांनी केले आहे. तर अधिक माहितीसाठी जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.  

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीमार्केट यार्डशेतकरीजळगाव