- रामदास बोरकर
गोंदिया : यादवराव हटवार यांच्या सायकलच्या घंटीचा आवाज येतातच परिसरातील नागरिकांना खोवावाले यादोराव आल्याची चाहुल लागते. ते गेल्या ४० वर्षांपासून सायकलवरून भ्रमण करुन घरीच तयार केलेला खोवा विक्री करतात. त्यांच्याकडे मिळणाऱ्या खोव्याचा दर्जा उत्तम (Khava Making) असल्याने त्यांचे ग्राहकदेखील पक्के आहे. त्यामुळे त्यांना फारशी भटकंती करावी लागत नाही. गेल्या ४० वर्षांपासून त्यांची ख्याती गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात कायम आहे.
भंडारा जिल्ह्याच्या (Bhandara District) सानगडी जवळील मिरेगाव येथील यादवराव सोमा हटवार (६१) हे गेल्या ४० वर्षांपासून खोवा विक्रीचे काम करीत आहेत. सणासुदीच्या दिवशी पावसाळ्याचे दिवस वगळून नियमित घरच्याघरी म्हशीच्या दुधापासून ते खोवा तयार करून विक्री करतात. खोवा तयार करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने चुलीवर लोखंडी कढईत दुधापासून ते शुद्ध खोवा तयार करतात. त्या कुठल्याही प्रकारची भेसळ नसल्याने यादवराव हटवार यांच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात भरपूर मागणी आहे.
हटवार यांची पाच एकर शेती आहे. तर गायी म्हशींचा राबता असल्याने दूध विक्रीचा (Milk Business) व्यवसाय करतात. यातूनच त्यांना खवा विक्रीची संकल्पना सुचली. त्यानंतर जवळपास ४० वर्षांपासून हा नित्यक्रम सुरु आहे. ते जवळपास २० किमीचा प्रवास सायकलने पार करतात. यासाठी एक मुलगा, सून व त्यांची पत्नी ललिता हे त्यांना यासाठी मदत करतात.
शुद्ध खवा तयार करण्याची परंपरा
शेतीला जोडधंदा म्हणून यांनी चार म्हशी घेतल्या आहेत. म्हशीच्या दुधापासून ते खोवा तयार करतात. दुधापेक्षा खोव्याला जास्त दर मिळत असल्याने यातून नफादेखील अधिक मिळत असल्याचे यादवराव यांनी सांगितले. एका आठवड्यातून दोन दिवस ते खोवा विक्री करतात. चार दिवस दुधाचे संकलन करून खोवा तयार करतात. यातून मिळणाऱ्या उत्पनातून त्यांच्या कुटुंबाचा उदनिर्वाह चालतो. वयाची ६१ गाठली तरी यादोराव हटवार यांचा सायकलवरुन खोवा विक्री करण्याचा नित्यक्रम सुरू आहे.
४० वर्षांपासून जपला ग्राहकांचा विश्वास
यादवराव सोमा हटवार हे मिरेगाव या छोट्याशा गावात राहतात. लहानपणापासून या धंद्यामध्ये कार्यरत आहेत. सांगलीपासून नवेगावपर्यंत त्यांच्या खोव्याला मागणी आहे. सुरुवातीला खूप स्वस्त खोवा विकायचे, आता चारशे रुपयाने दराने ते विक्री करतात. त्यांच्या कडील दर्जेदार आणि त्यात कुठलीही भेसळ नसल्याने त्यांचे ग्राहकदेखील तयार झाले आहे. गेल्या ४० वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात ते यशस्वी झाले आहे.