Join us

दुधाला ठरवून दिलेला तर ऊसाला अधिकचा भाव मिळाला पाहिजे, महसूलमंत्र्यांची भूमिका 

By गोकुळ पवार | Published: November 30, 2023 5:38 PM

जर शेतकऱ्यांच्या दुधाला सरकारने ठरवून दिलेला दर दिला जात नसेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.

नुकसानग्रस्त भागाला भरपाई, दुधाला सरकारने ठरवून दिलेला दर आणि सद्यस्थितीत उसाला मिळणारा दर यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कटाक्ष टाकत भाष्य केले. त्यानुसार लवकरच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त क्षेत्राला मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय सरकारने दुधाला ठरवून दिलेल्या दरानुसार खरेदी केली जात नसेल तर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे ऊस दरावरून वातावरण तापलं असून ऊसाला देखील उत्पादन खर्चापेक्षा अधिकचा भाव मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचे विखे यांनी स्पष्ट केले. 

अवकाळी पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास भरपाई देणार असल्याच्या निर्णयावरून सरकारवर टीका होत आहे. मात्र असल्या आरोप प्रत्यारोपाला कसलाही अर्थ नसल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटल आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची सर्व आकडेवारी आल्यावर तीन हेक्टरपर्यंतच्या क्षेत्राला आपण मदत करणार आहोत, याआधी दोन हेक्टरची अट होती. ती अट शिथिल करून आपण तीन हेक्टरची अट केली. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारची भूमिका असल्याचे राधाकृष्ण विखे म्हणाले

कारवाई केली जाईल... 

दुधातील भेसळ रोखण्यासाठी सरकारने कडक पावले उचलले असून दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 34 रुपये दर ठरवून  दिलेला आहे याबाबत सर्व खाजगी आणि सहकारी संस्थांना सूचना दिल्या आहेत. मात्र जर शेतकऱ्यांच्या दुधाला सरकारने ठरवून दिलेला दर दिला जात नसेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा दुग्धविकास मंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. 

उसाला अधिकचा भाव मिळाला पाहिजे... 

राज्यात ऊस दरावरून शेतकरी संघटना आक्रमक असल्याचे पाहायला मिळत आहे. बहुतांश कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे आणि त्यापेक्षाही अधिक भाव काही कारखान्यांनी दिले आहेत. काही कारखान्यांनी पहिला हफ्ता जाहीर केला आहे. पुढे ते रक्कम वाढून देखील देऊ शकतील, असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. कोणाच्याही सांगण्यावरून कारखानदार भाव देतो असं नाही, उद्योगाची स्थिती काय आहे, याचा विचार तो करतो. मात्र शेतकऱ्यांच्याही पिकाला उत्पादन खर्चापेक्षा अधिकचा भाव मिळाला पाहिजे, अशीच आमचीही भूमिका असल्याचे राधाकृष्ण विखे म्हणाले. 

टॅग्स :दूधनाशिकपाऊसऊस