नंदुरबार : २१ व्या पशुगणनेचे उद्दिष्ट जिल्ह्याने मुदतीपूर्तच अर्थात २५ मार्चपर्यंतच पूर्ण केले. या गणनेमध्ये नाशिक विभागात (Nashik Division) जिल्हा पहिला असून, राज्यात दहावा ठरला आहे. ९५९ गावांमध्ये व एक हजार २७ ठिकाणी भेटी देऊन प्रगणकांनी पशुगणना पूर्ण केली.
या गणनेनुसार जिल्ह्यात पशुधन (Livestock Census) कमी झाले असून, शेळीपालनाकडे (Goat Farming) वाढता कल असल्याचे गणनेतून पुढे आले आहे. पशुगणनेचा अधिकृत आकडा ३१ मार्चनंतर राज्यस्तरावरून जाहीर केला जाणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले. राज्याच्या १०० दिवस कार्यक्रमाअंतर्गत पशुसंवर्धन विभागाने २१ व्या पशुगणनेचा अंतर्भाव केला होता. त्यानुसार जिल्ह्यात पशुगणना (Pashu Ganana) करण्यात आली. २५ नोव्हेंबर ते ३१ मार्च या कालावधीत हा उपक्रम पूर्ण करावयाचा होता.
पशुधन कमी झाले, शेळीवर्गीय पशुंची संख्या वाढली...
शेतीचे वाढते यांत्रिकीकरण, चारा पिकाखालील कमी झालेल क्षेत्र, पशुधन सांभाळण्यासाठी वाढता व्यवस्थापन खर्च तसेच जिल्ह्यात दूध संकलन व प्रक्रिया उद्योगात असलेला सहकार क्षेत्राचा अभाव या कारणांमुळे पशुधन संख्या कमी होत असल्याचे चित्र आहे. परंतु, जिल्ह्यात असलेली नैसर्गिक परिस्थिती अनुकूल असल्याकारणाने शेळी व तत्सम पशुपालनाकडे वाढता कल असल्याचेही या पशुगणनेतून स्पष्ट झाले आहे.
३१ मार्च ही राज्यात पशुगणनेची शेवटची मुदत आहे. त्यानंतर सर्व जिल्ह्यांचा अहवाल हा राज्यस्ततरावर जाईल. तेथून माहिती संकलीत करून त्या-त्या जिल्ह्यातील पशुधनाची वर्गवारीनिहाय आकडेवारी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात कुठले पशुधन कमी झाले व कुठले वाढले हे स्पष्ट होणार आहे.
अशी झाली पशुगणना व असे नियुक्त होते कर्मचारी
पशुगणनेसाठी एकूण १०२ प्रगणक व २२ पर्यवेक्षकांची, तसेच शहरी क्षेत्रातील कामकाजासाठी १४ प्रगणक व तीन पर्यवेक्षक, असे एकूण ११६ प्रगणक व २५ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली. ९५९ गावे व ६८ वार्ड असे एकूण एक हजार २७ ठिकाणी प्रगणकांनी भेटी देऊन पशुगणना केली.
जिल्ह्यातील सर्व कुटुंब, कौटुंबिक उद्योग, बिगर कौटुंबिक उद्योग व संस्था यांना भेटी देण्यात आल्या. त्यांच्याकडील गाई, म्हशी, मेंढी, शेळी, वराह, घोडा, गाढव, शिंगरू, खेचर, ऊंट, कुत्रा, ससा या पशुधनासाठी वापरली जाणारी उपकरण याची प्रजातीनिहाय गणना करण्यात आली. पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालक व शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढीसाठी विविध योजनांच्या माध्यमातून हातभार लावला जात आहे.
ज्यामध्ये दुग्धोत्पादनात वाढीसाठी विशेष भर देण्यात येत आहे. त्याअंतर्गत दुधाळ पशुधनाची संख्या वाढली आहे. दुधाळ गायी व म्हशी, शेळ्या, मेंढ्यासह अवजड शेतीकाम उपयोगी असणाऱ्या गोधनाची गणना ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली. जिल्ह्यातील पशुपालकांनी त्यांच्याकडे असलेल्या पशुधनाची योग्य ती माहिती पशुगणनेसाठी घरी आलेल्या प्रगणकांना दिली.