Join us

अहो खरंच, आता आयव्हीएफ सेंटरच्या माध्यमातून तयार होतील ५० लिटर दुध देणाऱ्या गायी! 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 8:48 AM

छत्रपती संभाजीनगर शहरापासूनच जवळच खांडी पिंपळगावच्या डोंगरावर आयव्हीएफ प्रयोगशाळा साकारली आहे.

विजय सरवदे

छत्रपती संभाजीनगर : आतापर्यंत 'आयव्हीएफ सेंटर'च्या माध्यमातून मुले जन्माला घातली जातात, हे ऐकले आहे; पण या पद्धतीने जास्त क्षमतेने दूध देणाऱ्या गायी जन्माला घातल्या जातात, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही, होय, हे खरे आहे. छत्रपती संभाजीनगर जवळ अशी प्रयोगशाळा साकारण्यात आली आहे.  या प्रकल्पात ५० लिटरपर्यंत दूध देणाऱ्या विदेशी गायीच्या वंशावळीतील वळूचे वीर्य व आपल्याकडील उच्च प्रतीच्या गायीची बिजांडे प्रयोगशाळेत एकत्र रुजवून त्याद्वारे गर्भ तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

छत्रपती संभाजीनगर शहरापासूनच जवळच खांडी पिंपळगावच्या डोंगरावर 'भद्रा ब्रिडिंग सेंटर' अर्थात आयव्हीएफ प्रयोगशाळा साकारली आहे. या प्रयोगशाळेत दोन-तीन महिन्यांत तयार झालेला हा गर्भ सर्वसाधारण  गायीच्या पोटात वाढविला जाईल, दुग्धव्यवसाय हा जोडधंदा नव्हे, तर मुख्य व्यवसाय व्हावा, या दिशेने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सुपुत्र व नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण यांनी हे पाऊल टाकले आहे. शुक्रवारी या 'भद्रा ब्रिडिंग सेंटर'चे लोकार्पण राष्ट्रीय 'आयव्हीएफ' प्रकल्पाचे प्रमोटर व भारत सरकारच्या भ्रूण प्रत्यारोपण विभागाचे मुख्य सल्लागार श्याम झंवर यांच्या हस्ते झाले. झंवर हे सध्या देशातील ४४ 'आयव्हीएफ' अर्थात पशू भ्रूण प्रत्यारोपण केंद्रांचे सल्लागार म्हणून काम बघतात.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन व वंश सुधारणा योजनेच्या सहयोगातून डॉ. चव्हाण यांनी हा उच्च प्रत आणि जास्तीचे दूध देणारा अत्याधुनिक गोपालन प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पात जवळपास पाच सहाशे गायी असून त्यापैकी दीडशे गिर गायी, दोनशे विदेशी आणि दोनशे कालवडी आहेत. दोन तीन वर्षापूर्वी गोदरेज, रेमण्ड ग्रुपच्या 'आयव्हीएफ सेंटर'मध्ये जास्त दूध देणाऱ्या गायीचे भ्रूणाद्वारे जन्माला आलेल्या शंभर देशी-विदेशी गायी या प्रकल्पात आहेत. त्यापैकी काही गायी ५८ लिटरपर्यंत दूध देतात. ७ फेब्रुवारी रोजी या आयव्हीएफ प्रयोगशाळेत जास्त दूध देणाऱ्या सुमारे शंभर गायीची बिजांडे काढली असून १० फेब्रुवारी रोजी त्यात उच्च प्रतीच्या वळूचे वीर्य टाकून रुजविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तयार होणारे भ्रूण १६ फेब्रुवारी रोजी गायीच्या पोटात प्रत्यारोपण केले जाणार आहे. त्यानंतर दोन तीन महिन्यांत गाभण गायी मागणीनुसार शेतकन्यांना दिल्या जातील.

जैविक सुरक्षिततेचा देशातील पहिला प्रकल्प

खांडी पिंपळगावच्या डोंगरावरील गोपालन प्रकल्प व भदा बिडिंग आयव्हीएफ सेंटर हा देशातील पहिला जैविक सुरक्षितता असलेला प्रकल्प आहे, हे श्याम झंवर यांनी काल जाहीर केले. या प्रकल्पातील गायींना बाहेरची कोणतीही जनावरे किंवा माणसांचाही संपर्क येत नाही. त्यामुळे लम्पीसारख्या साथरोगाची लागण येथील जनावरांना झाली नाही.

टॅग्स :शेतीगायदुग्धव्यवसायदूध