गोंदिया : पावसाळ्याच्या कालावधीत गाय व म्हैसवर्गीय पशुधनात घटसर्प, फऱ्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची अधिक भीती असते. वेळीच उपचार न झाल्यास पशुधन दगावले जाऊ शकते. त्यामुळे हे आजार रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मे महिन्यापासून तालुक्यात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आले आहे.
खरिपाचा हंगाम सुरु होण्यास अजून काही अवधी असला तरीही पावसाळ्याच्या दिवसांत जनावरांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढावी. तसेच पशू आजार उद्भवल्यास त्यावर मात करता यावी, म्हणून पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मान्सूनपूर्व लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत तीन महिन्यांपेक्षा जास्त वयोगटातील गाई, म्हशीच्या वासरांनादेखील लसीकरण करण्यात येत आहे.
पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे
लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच यापुढे गावोगावी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याने सोय होणार आहे. जनावरांना धाप लागणे, चारा कमी खाणे, अशा प्रकारची लक्षणे जाणवल्यास पशुसंवर्धन दवाखान्यात जाऊन जनावरांना लस टोचून घेण्याचे आवाहन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
जिल्ह्यात लसी उपलब्ध
पहिल्या टप्प्यात पशुसंवर्धन कार्यालयास लम्पी चर्मरोगाच्या १ लाख ३९ हजार ७०० लसी उपलब्ध आहेत. तसेच गायवर्गीय घटसर्प रोगासाठीदेखील २ लाख १५ हजार ३५० लसी दिल्या आहेत. एकटांग्या रोगाच्या ४८ हजार ९५० लस, आंत्रविषार या म्हैसवर्गीय आजारासाठी ३९ हजार तर ११ हजार लसी शेळ्या, मेंढ्यासाठी उपलब्ध केल्या आहेत. तोंडखुरी, पायखुरीच्या ५४ हजार ९५० लसी उपलब्ध आहेत.
आजारी जनावरे अशी ओळखा...
फऱ्या, घटसर्प या आजारांमुळे पशुधनाला ताप येतो. एका पायाने अथवा चारही पायांनी चालताना त्रास होतो, चारा कमी खाणे, श्वास घेण्यास अडचणी, घशातून घरघर आवाज अशी लक्षणे देसून येतात. वेळीच उपचार न मिळाल्यास पशुधन मृत्युमुखीही पडू शकते. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.
प्रत्येक पशुधनाचे लसीकरण गरजेचे
लम्पी चर्मरोगाची साथ पसरू नये यासाठी आतापर्यंत १० हजार ७०० गायवर्गीय जनावरांचे लसीकरण केले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत गाय, म्हॅसवर्गीय पशुधनात घटसर्प, फऱ्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची सर्वाधिक भीती असते. यामुळे पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे जवळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात लसीकरण करून घ्यावे. तसेच पशुधनाचे आधार कार्ड बनवून घ्यावे. - डॉ. कांतीलाल पटले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि. प. गोंदिया.