Dairy Disease :कासदाह (Kasdah) म्हणजे दुधाळ जनावरांना येणारी सूज किंवा कासेला दगडासारखी टणक होणे. या आजाराला वैज्ञानिक भाषेत मस्टायटीस (Mastitis) म्हणतात. कासदाह झाल्यास जनावरांचे दूध देणे थांबते किंवा दूध उत्पादन (milk Production) कमी होते. पशुधनातील हा कासदाह टाळण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी, याबाबत जाणून घेऊयात....
कासदाह टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी
- दूध काढताना हात स्वच्छ धुवावेत.
- कास व सड कोमट पाण्याने धुऊन, कोरड्या कापडाने पुसून, निर्जंतुकीकरण द्रावणात डीप करून मगच दूध काढावे.
- मिल्किंग मशिनने दूध काढताना सड ओले राहिल्यास, कप ग्रीप चुकल्यास, व्हॅक्यूममध्ये बाधा आल्यास, गाय दूध काढताना तणावात असल्यास, कासेचा मागचा भाग खाली येऊन सड वरखाली होत असल्यास दूध काढण्याची प्रक्रिया अनियमित होऊन कासदाह होण्याचा धोका वाढतो.
- एकूण दुधाच्या ६० टक्के दूध हे मागील पायांजवळील दोन सडांमधून येत असते. त्यामुळे समोरील दोन सडांतून दूध लवकर काढून होते.
- मागील सडांना थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे समोरच्या सडाचे ड्राय पंपिंग होऊ शकते, परंतु यामुळे कासदाहाचे प्रमाण वाढत नाही.
- कासदाह झालेल्या गाईचे दूध शेवटी काढावे आणि दूध काढणीयंत्र निर्जंतुक करून घ्यावे.
- कासदाह झालेल्या गाई-म्हशीचे दूध अगोदर काढल्यास नंतरच्या सहा-आठ गाईंना कासदाह होऊ शकतो.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी