- लिकेश अंबादे
गडचिरोली : दूध व दुग्धजन्य पदार्थांची (Dairy products) मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे दूध उत्पादन या क्षेत्रात रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत. आज जसरी पकिटच्या दुधाचा पुरवठा होत असला तरी काही ग्राहक मात्र गावठी गायीचेच दूध खरेदी करतात. त्यासाठी ते अधिकची किंमत देण्यास तयार असतात. ही बाब लक्षात घेऊन कोरची येथील शेतकरी कमलनारायण खंडेलवाल यांनी गावठी गायी (Cow Milk) पाळण्यास सुरुवात केली आहे. दर दिवशी ४० लिटर दुधाचे उत्पादन (Milk Production) होते. त्यातून महिन्याला ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.
कमलनारायण खंडेलवाल यांना शुद्ध दूध व त्यापासून बनलेले पदार्थ खाण्याची आवड आधीपासूनच होती. त्यामुळे त्यांनी २०१८ मध्ये सुरुवातीला दोन गायी आणि सहा म्हशी छत्तीसगड राज्यातील धमतरी येथून विकत आणल्या, तेव्हापासून घरीच शुद्ध दुधापासून पनीर, दही, तूप, असे पदार्थ बनवू लागले. काही दूध परिसरातील नागरिकांना विकतात. सध्या बेतकाठी गावातील शेतात कमलनारायण खंडेलवाल यांच्याकडे चाळीस दुधाळ गायी, बारा दुधाळ म्हशी तसेच बारा वासरे आहेत.
या दुधाळ गायी व म्हशींपासून सकाळ, सायंकाळ मिळून दररोज ४० लिटर दूध मिळते. खंडेलवाल दररोज कोरचीपासून १० किमी अंतरावरील बेतकाठी शेतातील गोठ्यातून कॅटलीत स्वतःच दूध घेऊन येतात. यातील दहा लिटर दूध कोरची शहरातील एका हॉटेल व्यापाऱ्याला देतात तर बाकीचे दूध घरीच गावातील, परिसरातील ग्राहक विकत घेण्यासाठी येत असतात. काही दुधाचे पनीर आणि दही बनवले जाते. गायी-म्हशींची देखरेख करण्यासाठी बेतकाठी येथे तीन मजूर ठेवले आहेत. हे मजूर गाई आणि म्हशींना हिरवा चारा आणि त्यांना लागणारे अन्न वेळोवेळी देत असून, त्यांची काळजी घेत असतात.
शेणखताने शेती झाली समृद्ध वर्षभरात ३५ ट्रॅक्टर ट्रॉली शेणखत तयार झाले. हे शेणखत शेतात पीक घेण्यासाठी वापरले जाते. यातून शेतीत कमी खर्चात चांगले उत्पादन मिळते. तसेच या शेतातील उत्पादनाचा दर्जाही अतिशय चांगला असते. वेळोवेळी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून गाई म्हशींना लसीकरण केले जाते. तालुक्यामध्ये सध्या एवढ्या गायी आणि म्हशी पाळणारा हा एकमेव व्यक्ती आहे. इतर पशुपालकांना खंडेलवाल यांचे काम प्रेरणादायी आहे.