Join us

Adulterated Milk: दुध भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईसाठी राज्याचा स्वतंत्र कायदा, मुख्यमंत्र्याचे आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 2:34 PM

Dairy News : दुध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी एमपीडीएपेक्षाही कठोर असा राज्याचा स्वतंत्र कायदा करावा लागेल.

मुंबई : दुध व दुग्धजन्य पदार्थांतील (Bogus Milk) भेसळ रोखण्यासाठी एमपीडीएपेक्षाही कठोर असा राज्याचा स्वतंत्र कायदा (Special Law) करावा लागेल. तसेच अन्न पदार्थातील भेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हावा यासाठी केंद्राला शिफारस करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde) यांनी आज येथे सांगितले. राज्यातील दुधातील भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभाग यांनी संयुक्त मोहीम प्रभावीपणे राबवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अन्न पदार्थातील भेसळ ही गंभीर बाब आहे. यामुळे विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यवर गंभीर दुष्परिणाम होतो. आपल्या भावी पिढीचेही नुकसान होणार आहे. कर्करोगांसारखा दुर्धर आजारही अनेकांना जडतो. त्यामुळे भेसळखोरांवर एमपीडीएपेक्षांही कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. अन्न पदार्थातील भेसळ व दुध तसेच दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीविरोधात केंद्र व राज्य शासनाच्या दोन्ही यंत्रणांनी प्रभावीपणे कारवाईसाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा, मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यासाठी दोन्ही विभागांना सहकार्य केले जाईल. अद्ययावत प्रयोगशाळा, उपकरणे, मोबाईल प्रयोगशाळा यांसाठी केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल. 

दुधातील भेसळीचा दुध उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसतो. त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्यावर दूरगामी दुष्परिणाम देखील होतात. हे अत्यंत चिंताजनक असून, याला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग आणि दुग्ध व्यवसाय विकास विभाग यांनी संयुक्तपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. तातडीची उपाय योनजा म्हणून या दोन्ही विभागांनी संयुक्त मोहीमा आखाव्यात. त्यासाठी गृह विभागही सहकार्य करेल. दुधातील भेसळीविरोधात राज्याचा स्वतंत्र कायदा करण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाने कार्यवाही करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. बैठकीत माजी आमदार  धस यांनी काही समाजकंटकांमुळे दुध भेसळ उघडकीस आली की त्याचा दुध विक्रीवर परिणाम होतो, त्याचा फटका अंतिमतः दुध उत्पादक शेतकऱ्यांना बसत असल्याचे सांगितले. 

दुग्ध आयुक्तांसोबत आज बैठक 

कोतुळ येथे 20 दिवस सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर व संपन्न झालेल्या कोतुळ ते संगमनेर ट्रॅक्टर रॅलीच्या पार्श्वभूमीवर दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार राज्याचे दुग्ध आयुक्त मोहोड, संगमनेर प्रांत कार्यालय या ठिकाणी कोतुळ आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आज 26 जुलै 2024 रोजी बैठक होत आहे. या बैठकीसाठी आंदोलकांच्या वतीने दहा जणांचे शिष्टमंडळ चर्चेसाठी जाणार असून सकारात्मक तोडगा निघतो का? हे पाहावे लागणार आहे. 

टॅग्स :एकनाथ शिंदेदूधदूध पुरवठादुग्धव्यवसायशेती क्षेत्र