Goat Farming Technique : शेळी पालन व्यवसाय (Goat Farming) करताना जागेची निवड जेवढी महत्वाची असते, तेवढीच शेळ्यांचे गोठे सुबक असणे आवश्यक असते. जेणेकरून शेळ्यांना सोयीस्कर निवारा उपलब्ध होईल. आजच्या भागात शेळ्यांचे गोठे (Sheli Palan Gotha) किंवा वाडे कसे असावेत, आतील जमीन कशी असावी, गोठ्यांची स्वच्छता कशी राखावी हे घटक समजून घेऊयात...
शेळ्यांच्या गोठ्याची रचना
- शेळ्यांचे वाडे इंग्रजीमधील (A) अक्षरासारखे दुपाखी असावेत. त्याची मधील उंची १० ते १२ फुट तर बाजूची ७ ते ८ फुट असावी.
- गोठ्यावरील खर्च हा अनुत्पादक खर्च आहे. त्यामुळे स्थानिकरित्या उपलब्ध असलेल्या गव्हाचे काड, भाताचा पेंढा, गवत, ऊसाचे पाचट इ. चा छपराकरिता उपयोग केल्यास कमी खर्चात वाडा तयार होऊ शकेल.
- असबेस्टॉस किंवा सिमेंटच्या पत्र्याचाही वापर करुन शकतो.
- छपराची जाडी किमान ७.५ सें.मी. असावी.
- त्याचप्रमाणे वायुविजनासाठी गोठ्यातील तळपृष्टाच्या (Floor Space) २५ टक्के जागा मोकळी असावी व जमिनीपासून १.२ मीटर उंचीवर असावी.
गोठ्याच्या आतील जमीन :
- जमिनीवर जाड असा भाताच्या किंवा गव्हाच्या पेंढ्याचा थर पसरविल्यास थंडीच्या दिवसात उष्णता मिळविण्यासाठी उपयोगी ठरतो.
- तसेच पातळ थर उष्ण हवामानात उपयोगी ठरतो.
- गोठ्याची जमीन सतत कोरडी राहील अशी असावी, जनावरांना उठतांना बसतांना दुखापत होणार नाही, अशी रचना असावी.
गोठ्यासाठी लागणारी आवश्यक साधने :
खाद्यांची भांडी :
- चौकोनी किंवा पटकोनी आकाराची खाद्यपात्रे या दृष्टिने उपयोगी आहेत. यामधून वाळलेला चारा वाया जात नाही.
- शेळ्यांनी चारा तुडविला जात नाही व खराब होत नाही.
- चौकोनी भांड्याची लांबी ६ फुट, खोली ४ इंच आणि उंची २-२.५ फुट असावी.
- दोन गजांमधील अंतर साधारण १० से. मी. एवढे असावे.
पाण्याची भांडी :
- शेळ्यांना पाणी पिण्यासाठी लंबगोलाकार आकाराचा सिमेंटच्या नळ्या ६ फुट लांब, १ फुट रुंद व १/२ फुट खोल (पाणकुट्या) ठेवल्या जातात.
- तसेच पिण्याच्या भांड्याकरिता प्लॅस्टिक टपचा वापर करण्यात यावा.
- एका शेळीसाठी पाण्याच्या भांड्याची ३ ते ४ से. मी. लांबी पुरेसी आहे.
टीप : वाड्यामध्ये शेळ्या विण्यासाठी, दुधाच्या शेळयासाठी, करडांसाठी, पैदासीच्या बोकडांसाठी स्वतंत्र जागा असावी.
शेळ्यांच्या व्यायामाची व्यवस्थेकरिता १ चौ. मी. लांबी, रुंदीचे व ६० से. मी. उंचीचे खोके करुन ठेवावे.
गोठ्यांचे प्रकार :
१) जमिनीवरील गोठे : उष्ण कटिबंधातील ऊबदार हवामानाच्या सपाट प्रदेशात जमिनीवरील गोठ्यांचा वापर केला जातो.
२) पिंजरा पध्दत / माचाण पध्दत :
- दलदलीच्या पावसाळी दमट हवामानाच्या प्रदेशात जमिनीच्या पातळीपासून ५ फुट उंचीवर स्थानिक साहित्याचा (लाकूड, बांबू, लोखंड) वापर करुन मचाण तयार करतात.
- मचाणीमध्ये लाकडी पट्ट्या, बांबू वापरुन तसेच बाजूनी जाळीचा वापर करतात.
- वरच्या बाजूला छप्पर किंवा पत्र्याचे छत वापरले जाते.
- मलमुत्र लाकडी / बांबुच्या पट्टीतून खाली पडते.
गोठ्यांची स्वच्छता :
- दररोज दोन वेळा
- पाण्याचे हौद, चात्याच्या गव्हाणीला महिन्यातून एक वेळा चूना लावावा.
- वाड्याच्या जाळ्या, भिंत झाडून घ्याव्यात.
- रोगराईच्या काळात वाड्यामध्ये चुन्याची पावडर टाकावी किंवा महिन्यातून एकदा रसायनाचा वापर करुन वाडे निर्जंतूक करुन घ्यावेत.
- (फिनाईल ५ टक्के, मॅलेथिआन १०%, फॉरमॉल्डीहाईड २%)
- पिण्याच्या पाण्यात पोटॅशिअम परमॅग्रेट (०.०१%)
- डॉ. सचिन टेकाडे, महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ, नाशिक