Join us

Goat Farming Disease : शेळीपालन व्यवसायात लसीकरण वेळापत्रक तयार ठेवा, अन्यथा.... वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 15:52 IST

Goat Farming Disease : शेळी पालन (Goat Farming) करताना शेळ्यांचे लसीकरण वेळापत्रक पाळणे आवश्यक ठरते. 

Goat Farming Disease : पशुधनासाठी (Livestock Vaccination) लसीकरण ही फायद्याची बाब म्हणून ओळखली जाते. कारण वेळच्या वेळी लसीकरण केल्यास जनावरे आजारी किंवा दगावण्याचे प्रमाण कमी होते. शिवाय सुदृढ पशुधन हे अधिक दूध उत्पादन देण्यास तयार असते. शेळ्यांच्या बाबतीत देखील लसीकरण महत्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे शेळी पालन (Goat Farming) करताना शेळ्यांचे लसीकरण वेळापत्रक पाळणे आवश्यक ठरते. 

  • शेळ्यांचे लसीकरण वेळापत्रक पाहिले असता यात प्राथमिक लसीकरण आणि वार्षिक लसीकरण असे दोन भाग पडतात. विविध आजारांवर त्या त्या महिन्यानुसार हे लसीकरण केले जाते. 
  • त्यानुसार लाळ्या खुरकूत या रोगावर प्राथमिक लसीकरण हे वयाच्या तिसऱ्या महिन्यात आणि वार्षिक लसीकरण हे वर्षातून दोन वेळा मार्च व सप्टेंबर महिन्यात केले जाते. 
  • घटसर्प या आजारावर प्राथमिक लसीकरण हे वयाच्या तिसऱ्या महिन्यात तर वार्षिक लसीकरण हे एप्रिल महिन्यात केले जाते. 
  • आंत्र विषार या रोगावर प्राथमिक लसीकरण मादी शेळी गर्भावस्थेत असताना लसीकरण केलेले असल्यास करडांच्या वयाच्या चौथ्या महिन्यात अन्यथा आठव्या आठवड्यात लसीकरणाच्या पहिली मात्रा आणि 15 ते 21 दिवसांनी दुबार मात्र देण्यात यावी, तर वार्षिक लसीकरण हे मे महिन्यात पहिली मात्रा व पंधरा दिवसांनी दुबार मात्रा देण्यात यावी. 
  • पीपीआर या रोगावर प्राथमिक लसीकरण हे वयाच्या तिसऱ्या महिन्यात तर वार्षिक लसीकरण हे जून महिन्यात त्यानंतर तीन वर्षातून एकदा असे देण्यात यावे. नीलजीव्हा या रोगावर प्राथमिक लसीकरण हे वयाच्या तिसऱ्या महिन्यात तर वार्षिक लसीकरण हे जुलै महिन्यात देण्यात यावे. 
  • धनुर्वात या आजारावर प्राथमिक लसीकरण हे वयाच्या तिसऱ्या महिन्यात आणि वार्षिक लसीकरण हे ऑक्टोबर महिन्यात देण्यात यावे. 
  • तसेच मेंढ्यांमधील देवी या आजारासाठी प्राथमिक लसीकरण हे वयाच्या तिसऱ्या महिन्यात तर वार्षिक लसीकरण हे डिसेंबर महिन्यात देण्यात यावे. 
  • शेळ्यांमधील देवी आजारासाठी प्राथमिक लसीकरण हे वयाच्या तिसऱ्या महिन्यात तर वार्षिक लसीकरण हे डिसेंबर महिन्यात देण्यात यावे.

- डॉ. सचिन टेकाडे, सहाय्यक संचालक, महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ, नाशिक 

टॅग्स :शेळीपालनशेती