उन्हाचा कडाका वाढल्याने मनुष्याप्रमाणेच पशूप्राण्यांना देखील उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यात पशुधनाची काळजी घेणे महत्वाचे असते. कारण अनेकदा गाई, म्हशी, शेळ्या मेंढ्याना चारण्यासाठी दूरवर न्यावे लागते, अशावेळी उन्हाची दाहकता अधिक असल्याने पशुधनाला उष्माघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यात चराई व्यवस्थापन होणे आवश्यक असते.
चराई म्हणजे काय तर शेळ्या मेंढ्या गाई म्हशी यांनी घरापासून जिथे चारा आणि पाण्याची सोय असते ठिकाणी चराईसाठी नेले जाते. ज्यामध्ये पाळीव पशुधनांना घराबाहेर मोकळेपणाने, गवत, चारा इत्यादींचे सेवन करण्याची परवानगी दिली जाते.
शेळीसाठी काय काळजी घ्यावी?
महाराष्ट्रात सर्वसाधारणतः शेळ्या या चराई पद्धतीवर पाळल्या जातात. त्यात त्यांना रोज चरण्यासाठी किमान ८ ते ९ किलोमीटर चालावे लागते. उन्हाळ्यात बहुतांश वेळी चराई क्षेत्रावर चरण्यासाठी खूप कमी व निकृष्ठ प्रतीचा चारा शिल्लक असतो. अशावेळी शेळ्याची बरीच शक्ती चालण्यात जाते आणि त्यांना पोटभर अन्नही मिळत नाही. तसेच उन्हात चरण्यामुळे त्यांना भीषण उष्ण तापमानाचा सामना करावा लागतो आणि त्यांना उष्णतादाह होण्याची शक्यता असते. तसेच शेळ्यांच्या वाढ, उत्पादन व प्रजोत्पादनात घट येते.
उन्हाळ्यातील चराई व्यवस्थापन
शेळ्यांना चरण्याकरिता सकाळी लवकर (५ ते ९ दरम्यान) आणि सायंकाळी चराईसाठी सोडावे. शक्य नसल्यास चराई क्षेत्रावर त्यांना दुपारी १२ ते ४ या वेळेत दाट सावलीच्या झाडाखाली ठेवावे. काही वेळा शरीरातील पाणी कमी होऊन त्या दगावण्याची शक्यताही वाढते आणि व्यवसायात तोटा संभवतो. म्हणून या व्यवसायातील वृद्धीसाठी उन्हाळ्यात शेळ्यांची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते.
उन्हाळ्यात पशुधनाची काळजी
उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याच्या टंचाईमुळे, जनावरांच्या खादयामध्ये आकस्मिक बदल होतो. उन्हाळयामध्ये जनावरांना मिळेल ते खादय देवून त्यांची गरज भागविणे यावरच भर दिला जातो त्यामुळे त्यांना बऱ्याच वेळेस निकृष्ट प्रतिचे खादय दिले जाते. जनावर खाताना रवंथ करत नाहीत, त्यामुळे अपचनासारखे आजार होतात त्याकारणाने ते चारा कमी खातात किंवा पूर्णपणे बंद करतात, म्हणून दूध उत्पादनात घट होते, प्रजनन क्षमता कमी होते, वजन घटते. अतिप्रखर सुर्यप्रकाशामुळे तडक्या सारखे चामडीचे आजार होतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जनावरांची योग्य व्यवस्थापन करुन उष्णतेचा ताण कमी करून उत्पादन टिकवून ठेवण महत्वाच असते. जनावरांचे शरिरामध्ये त्यांनी खाल्लेले अन्न, शरिरात साठविलेली चरबी व पोटामध्ये होणारी आबवणक्रिया इत्यादी कारणांनी ऊर्जा निर्माण होते. शरीरात निर्माण झालेल्या उर्जेचा उपयोग शरिरक्रिया चालू ठेवणेसाठी होत असतो, त्याशिवाय अतिरिक्त ऊर्जा जनावराचे शरिर वाढीसाठी व दुधउत्पादन वाढीसाठी उपयोगी असते.
सौजन्य :
विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी