Join us

तापमान वाढलं, गाईचं दूध उत्पादन घटलं, उन्हाळ्यात 'हे' उपाय कराचं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 4:17 PM

जो शेतकरी जनावरांना हिरवागार चारा चारतो, त्यांच्याच गाईच्या दुधात घट होत नसल्याचे चित्र आहे.

दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढू लागला आहे, त्यामुळे पाळीव जनावरांची लाहीलाही होत आहे. अशा अवस्थेत शेतकऱ्यांना त्यांची विशेष काळजी घ्यावी लागत आहे. जो शेतकरी जनावरांना हिरवागार चारा चारतो, त्यांच्याच गाईच्या दुधात घट होत नसल्याचे चित्र आहे. मात्र, काही गोपालक जनावरांकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्या मालकीच्या गाईंच्या दूध उत्पादनात घट येत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

संकरित व विदेशी रक्तगट असणाऱ्या गाईंसाठी २४ ते २६ अंश सेल्सिअस, देशी गाईंसाठी ३३ अंश सेल्सिअस तर, म्हशींसाठी ३६ अंश सेल्सिअस ही तापमानाची उच्च सहनपातळी आहे. दिवसेंदिवस वातावरणातील तापमान वाढू लागले की, जनावरे या वाढत्या तापमानाला जुळवून घेण्यासाठी घाम श्वासाची गती वाढवून थंड ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, एक वेळ अशी येते की, जनावरे घाम व श्वासाच्या गतीद्वारे शरीर थंड ठेवू शकत नाहीत, त्यांच्या शरीराच्या तापमानामध्ये वाढ होण्यास सुरुवात होते. जनावरे उष्णतेच्या तानाला (हिटस्ट्रोक) बळी पडतात, त्यांचा जनावरांच्या आरोग्यावर उत्पादनावर व प्रज्योत्पादनावर विपरीत परिणाम होतो. संकरित व विदेशी रक्तगटाच्या गाई व देशी गाई उष्णतेला बळी पडतात. चांगले दूध उत्पादन घ्यावयाचे असल्यास जनावरांच्या व्यवस्थापनात बदल करणे अपेक्षित असते.

तापमानामुळे जनावरांना होणारे परिणाम

हवेतील उष्णता वाढल्यामुळे जनावरांच्या तापमानात- देखील वाढ होते. त्यामुळे ही ऊर्जा उत्पन्नास हवी असते. ते शरीराचे तापमान संतुलित राखण्यास खर्च होते परिणामी, दूध उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी होऊ शकते. शरीराचे तापमान वाढल्याने जनावरांची भूक कमी होऊन पाण्याची गरज वाढते. ती पूर्णपणे भागवली नाही तर, शरीरातील पेशींमध्ये पाणी कमी होते. शरीरातील प्रमाणही बदलते, त्यामुळे भूक मंदावते. जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जनावरे इतर आजारांना बळी पडतात.

काय उपाययोजना कराल

सुयोग्य निवारा

गोठ्याची रचना ही उष्णतेचा ताण कमी करणारी असावी. गोठ्यातील तापमान १५ ते २५ अंश सेल्सिअस राखण्याचा प्रयत्न करावा, गोठा व परिसर थंड राहील, याची काळजी संबंधितांनी घ्यावी. गोठ्यात जनावरांना बसण्यासाठी सावलीची भरपूर जागा उपलब्ध करावी. चाळीस ते पन्नास फूट गोठ्यात जनावरांची गर्दी करू नये. गोठ्याचे छत पत्र्याचे असतील तर त्याला बाहेरून पांढरा रंग लावावा. गोठ्याच्या छतावर गवत पाचट किवा उपलब्ध तन्नस सामग्रीचे सहा इंच जाडीचे आच्छादन घ्यावे. जनावरांना प्रखर सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या परिसरातील उन्हाळ्याच्या दिवसात झाडे व हिरवळ असणे उपयुक्त ठरते.

एका दुधाळू गाईला उन्हाळ्यात १०० लिटरपेक्षा जास्त पाण्याची गरज असते. वाढत्या उष्णतेमुळे शरीरातील तापमान सामान्य ठेवण्यासाठी घामाचा वेग वाढतो त्यासाठी पाण्याची गरज असते. उन्हाळ्यामध्ये जनावरांना चार ते पाच वेळा पाणी पाजावे किवा शक्य असल्यास २४ तास उपलब्ध करून द्यावे, पाणी पिण्याची जागा सावलीत व जनावरांच्या अगदी जवळ असणे गरजेचे आहे.

असे करावे आहार व्यवस्थापन

जनावरांच्या आहारात भरपूर हिरव्या चाऱ्यांचा समावेश असावा, जनावरांचा चारा हा वातावरण थंड असताना सकाळी, सायंकाळी व रात्री द्यावा, हिरवा चारा दुपारी द्यावा. आहारामध्ये ऊर्जा देणारे पदार्थ धान्य, गोड, मळी, तेलयुक्त पदार्थ तज्ज्ञांच्या सल्ल्याने समाविष्ट करावे. उन्हाळ्यात खनिज मिश्रणाची मात्रा वाढवून घ्यावी, तसेच मीठ खाण्याच्या सोड्याचा आहार द्यावा. शेड बंदिस्त असेल तर, गरम हवा बाहेर जाण्यासाठी जागा असावी. गोठ्यात मोठे पंखे बसविल्यास हवा खेळती राहील गोठ्यातील वातावरण व जनावरे सुरक्षित राहण्यासाठी दर अर्ध्या तासाने दोन ते तीन मिनिटे जनावरांच्या अंगावर पाण्याची फवारणी केल्यास जनावरांसाठी अत्यंत उपयुक्त राहते. पाण्याची फवारणी स्वयंचलित यंत्रणा बसवून फॉर्मसंच्या साह्याने किंवा हाताने करावी. अशा गोठ्यात दमटपणा वाढू नये म्हणून पंखे सुरु ठेवा.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीहवामानमार्केट यार्डदुग्धव्यवसायवर्धा