Animal Care In summer : राज्यात उन्हाचा तडाखा (Temperature High) वाढत आहे. रोजचे तापमान ४२ ते ४८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान एवढे आहे. अशा वाढत्या तापमानात माणसांसह जनावरांना देखील उष्माघाताचा धोका संभवत असतो.
काही परिसरात तर जनावरे दगावण्याची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही. तापमान वाढीमुळे जनावरांमध्ये मुख्यता उष्माघात (Heatstroke), गर्भपात, शरीरताप दिसून येत आहे. म्हणूनच अशा प्रतिकूल परीस्थितीत जनावरांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
असे करा गोठ्याचे व्यवस्थापन
- जनावरांचा गोठा हा सुद्धा उष्माघात, ताण तणाव याचा एक प्रमुख घटक आहे.
- त्याचे योग्य व्यवस्थापन करून वातावरणातील तापमान नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करावा.
- छताच्या पत्र्यांवर शेतातील तुराट्या, पराट्या, कडबा किंवा इतर वनस्पतींचा पालापाचोळा अंथरल्यास गोठ्यात तापमान कमी होते.
- जनावरांच्या शरीरावर दिवसातून २ ते ३ वेळ थंड पाणी फवारावे.
- परिसर थंड राहण्यासाठी गोठ्याच्या सभोवताली झाडे लावावीत, मुक्त संचार गोठयाचा अवलंब करावा.
- गोठ्यामध्ये वातावरण थंड राहण्यासाठी पाण्याचे फवारे, स्प्रिंकलर्स यासोबत पंख्याचा वापर करावा.
- गोठ्यांमध्ये हवा खेळती राहावी, यासाठी पंखा, कूलरची सोय करावी.
- दुपारच्यावेळी वातावरणातील उष्णतेच्या झळा लागू नये म्हणून गोठ्यामध्ये पाण्याने ओले केलेले गोणपाटाची पडदे लावावीत. यामुळे गोठ्यातील वातावरण थंड राहील.
- हवामानपुरक सुधारित गोठे बांधावेत. गोठ्याची ऊंची जास्त असावी जेणेकरून गोठ्यात हवा खेळती राहील.
- छप्पराला शक्यतो पांढरा चुना/ रंग लावावा. तसेच त्यावर पालापाचोळा/ तुराट्या/ पाचट टाकावे, ज्यामुळे सूर्याची किरणे परावर्तीत होण्यास मदत होईल.
खाद्याचे व्यवस्थापन
- शक्य झाल्यास जास्तीत जास्त हिरवा चारा जनावरांना द्यावा. हिरवा चाऱ्याची पूर्तता करण्यासाठी हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा उत्पादन करू शकतात.
- जनावरांच्या खाद्यामध्ये क्षार मिश्रण, गुळ, मीठ,ताक व खाण्याचा सोडा इ. चा वापर करावा.
- सोबतच पशुतज्ञांच्या सल्ल्याने जीवनसत्व अ,क आणि उष्णतारोधक सेलेनिम जीवनसत्व याचा वापर करावा.
- लहान करडांची, विशेषतः म्हशीच्या वासरांची विशेष काळजी आवश्यक असून, त्यांना उर्जावर्धक औषधे द्यावीत.
- गाभण जनावरांचा गर्भपात टाळण्यासाठी दिवसभर पूर्ण सावलीत ठेवावे व अस्वस्थ जनावरांना तातडीने पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत.
- जवळच्या कृषी उत्पन्न बाजारात शिल्लक राहिलेला भाजीपाला किवा कमी किमतीत मिळणारा भाजीपाला व फळे याचा वापर जनावरांच्या खाद्यात करता येईल.
- लग्नसराईचे दिवस असल्याने उरलेले व खराब झालेले अन्न जनावरांना अजिबात देऊ नका,
- पावसाळ्यापूर्वी घटसर्प व फऱ्या रोगप्रतिबंधक लसीकरण जरूर करून घ्यावे.
- संदीप नेरकर, पशु विज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव