- डिगंबर महाले
अमळनेर : राज्याबाहेरील पशुधनाची खरेदी (Livestock Market) करण्यासंदर्भातील शासन निर्णय तसेच कोरोना आणि लम्पी आजारामुळे तालुक्यात गेल्या पाच वर्षांत पशुधन खरेदी-विक्रीचा व्यवहार वर्षानुवर्षांच्या सरासरीपेक्षा दहापट कमी झाला आहे. त्यामुळे अमळनेर (Amalner Market) बाजार समितीला केवळ पाच लाखांचा कर मिळाला आहे.
पशुधन वाढावे म्हणून राज्याबाहेरील पशुंची खरेदी करावी, असा शासन निर्णय आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर होणारी पशुधनाची शासकीय खरेदी-विक्री बंद पडली. याचा परिणाम बाजार समितीला मिळणाऱ्या करावर झाला असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक पशुधनाची संख्या वाढावी म्हणून राज्याबाहेरीलच पशुधनाची खरेदी करावी, असा २०१८-१९ मध्ये शासन निर्णय झाला आहे. त्यामुळे येथे होणारी शासकीय खरेदी बंद झाली. शिवाय २०१९-२० मधील कोरोनामुळे बाजार समिती बंद होती. त्यानंतर लम्पी आजाराचाही प्रभाव खरेदी-विक्रीवर दिसून आला.
१.०५ टक्के कर वसुलीमागील पाच वर्षात एकूण पशुधनाच्या विक्रीतून बाजार समितीत ५ कोटी ३ लाख २ हजार ३०० रुपयांची उलाढाल झाली. निकषानुसार बाजार समितीतर्फे कर रुपात प्रत्यक्ष वसुली १.०५ टक्के करण्यात आली. त्यातून बाजार समितीला १ टक्का कररुपी ५ लाख ३ हजार २०३ रुपये मिळाले तर उर्वरित ०.५ टक्के रक्कम ही शासनाला द्यावी लागली. याबाबत अमळनेर बाजार समिती सभापती अशोक पाटील म्हणाले की, बाजार समितीचे उत्पन्न वाढावे, यासाठी प्रयत्नशील आहोत. धान्यासह विविध पशुंच्या व्यापाऱ्यांना आम्ही सर्व प्रकारच्या उत्तमोत्तम सेवा-सुविधा देत आहोत. आगामी काळात पशुधनाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ होण्यासंदर्भात आम्ही आशादायी आहोत.
पाच वर्षांतील व्यवहार■ पाच वर्षांत बाजार समितीच्या माध्यमातून ९ हजार ९०१ गायी, बैल, म्हैस, शेळ्या आणि बोकड यांची विक्री करण्यात आली.■ २०१८-१९ मध्ये ४ हजार ६७८ पशुधनाच्या विक्रीतून २ लाख २९ हजार ८८० रुपये कर मिळाला.■ २०१९-२० मध्ये ३ हजार ५९८ पशुधन विक्रीतून १ लाख ५४ हजार ३५ रुपये.■ २०२०-२१ मध्ये २१६ पशुधन विक्रीतून २५ हजार ८६५ रुपये कर मिळाला. २०२१-२२ मध्ये ७२५ पशुधन विक्रीतून ५८ हजार २६ रुप कर मिळाला.■ २०२२-२३ मध्ये ६७५ पशुधन विक्रीतून ३५ हजार ३९७ रुपये असा एकूण ५ लाख ३ हजार २०३ रुपयांचा कर मिळाला आहे.