Join us

Vasu Baras 2024 : नाशिकमधील गोशाळांमध्ये दोन हजारांहून अधिक गायींचे संगोपन, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 12:53 PM

Vasu Baras 2024 : नाशिकमध्ये जवळपास सात गोशाळा असून यात गायींचे संवर्धन, संगोपन केले जाते.

नाशिक : दीपोत्सव अर्थात दिवाळीला खऱ्या अर्थाने सोमवारी वसुबारसने (Vasubaras) सुरुवात झाली असून, भारतीय संस्कृतीत गाईला विशेष महत्त्व दिले आहे. नाशिकमध्ये (Nashik) जवळपास सात गोशाळा असून यात गायींचे संवर्धन, संगोपन केले जाते. आजच्या दिवशी सामूहिक गोपूजन केले जाते. तसेच दरवर्षी मोठा सोहळा आयोजित केला जातो.

नाशिक शहरात असणाऱ्या सात गोशाळांमध्ये (Nashik Goshala) जवळपास दोन हजारहून अधिक गाय-वासरांचे संगोपन केले जाते. वसुबारस निमित्ताने त्यांचे पूजन करण्यात येते. यंदा गोशाळेमध्ये कीर्तन, भजन, गो-पूजनासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील गोशाळांमध्ये सोमवारी सायंकाळी वसुबारसचे पूजन होत असून, सहभागी होण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

मंगलरूप गोशाळा

या गोशाळेत एकूण १६५ गोवंशाचा सांभाळ केला जातो. गेल्या १२ वर्षांपासून आजारी आणि अपघातग्रस्त गोवंशांसाठी गोशाळा चालवली जाते. टीबी, ट्यूमर, कॅन्सर असलेल्या अपघातग्रस्त गाईवर शाळेत उपचार आणि संगोपन होते. गोशाळेचे व्यवस्थापक पुरुषोत्तम आव्हाड त्याचे कामकाज पाहतात.

ऊर्जा गो संवर्धन संशोधन केंद्र 

या गोशाळेत ४० गोमातांचे संगोपन केले जाते. गेल्या १५ वर्षांपासून गोवंशासाठी गोशाळा चालवली जाते. त्या शाळेत आजारी असलेल्या गोमातांवर औषधोपचार केले जातात. नित्यनियमाने संगोपन करण्याचे काम सत्यजित शाह पाहतात. 

कृषी गोसेवा ट्रस्ट : 

या शाळेत एकूण २२५ गोवंशांचे संगोपन केले जाते. गेल्या ३५ वर्षांपासून आजारी आणि अपघातग्रस्त गोवंशासाठी गोशाळा चालवली जात असल्याची माहिती गोशाळेच्या रूपाली जोशी यांनी दिली. 

नंदिनी गोशाळा : 

या गोशाळेत गेल्या १९ वर्षांपासून जीवदया गाईचे संगोपन केले जाते. गोशाळेत उपचार केले जातात, संगोपन केले जाते. या गोशाळेत २०० गोमातांचे पालन पोषण केले जात असल्याची माहिती एन. एम. पोतदार यांनी दिली. 

गो शाळा, बालाजी मंदिर : 

गंगापूर रोड येथील बालाजी मंदिर येथे गो शाळा चालवली जाते. त्याठिकाणी गेल्या २००५ पासून गुजरात येथील गीर गाईंचे संगोपन केले जाते. सध्या ६० ते ६५ गायींचा समावेश या शाळेत आहे. या ठिकाणी वसुबारसनिमित्त विविध कार्यक्रम होतात.

टॅग्स :शेती क्षेत्रदुग्धव्यवसायगायदिवाळी 2024नाशिक