मालेगाव : लाळ्या-खुरकुत रोगाचा प्रादुर्भाव तसेच रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन जनावरांचा मृत्यू होणे व प्रादुर्भाव झालेल्या जनावरांच्या दूध उत्पादनात 50 टक्के घट होण्यापासून सावध राहण्यासाठी तालुका पशुवैद्यकीय कार्यालयामार्फत तालुक्यात लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने पिकांचे नुकसान झाले. नदी, नाले, लघू व मध्यम प्रकल्पांसह विहिरीला पुरेसे पाणी नसल्याने रब्बी हंगामाला शेतकरी मुकले आहेत. अशा दुष्काळी संकटात लाळ्या-खुरकुत आजारापासून जनावरांचे संरक्षण व्हावे, यासाठी तालुक्यातील गाई व म्हैसवर्ग पशुंना नजीकच्या दवाखान्यातून लसीकरण करण्याचे आवाहन केले जात आहे. मालेगाव तालुक्यातील 1 लाख 54 हजार 446 गाय, म्हैस व 1 लाख 73 हजार 507 शेळ्यांना लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी शासनाकडून पशुवैद्यकीय विभागाला लस उपलब्ध झाली आहे.
रोगाची लक्षणे काय आहेत?
ताप येतो, खाणे-पिणे कमी किवा बंद होते.
तोंडात, जिभेवर, हिरड्यांवरील श्लेष्मल व खुरातील बेचक्यात फोड येतात. ते फुटून त्याचे व्रण बनतात.
तोंडातून लाळ गळते व नाकातून स्राव वाहतो.
जनावरे लंगडतात व कधी कधी तर संपूर्ण खूर बाहेर येतात.
गाय-म्हशीच्या कासेवर कधी कधी फोड व वण होऊन स्तनदाह होतो.
संसर्गामुळे कळपातील इतर गुरांना आजाराची लागण होते.
वर्षातून दोन वेळा दिली जाते लस
लाळ्या-खुरकुत या विषाणूजन्य आजाराच्या 77 हजार प्रतिबंधात्मक लस तालुक्यासाठी शासनाकडून प्राप्त झाल्या. ही लस जिल्ह्यातील म्हेस व गायवर्गीय सर्वच जनावरांना 21 दिवसांच्या कालावधीत तालुक्यातील सर्व शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयातून देण्यात येत आहे. लसीकरण झाल्यानंतर जनावरांना सावलीत बाधून भरपूर पाणी पाजावे, बैलांना एक दिवस विश्रांती द्यावी, असे आवाहन पशुपालकांना केले जात आहे. तर सदर लस वर्षातून दोन वेळा दिली जात असल्याचे पशुवैद्यकीय विभागाने सागितले.
अशी आहे जनावरांची आकडेवारी
मालेगाव तालुक्यात जवळपास 1 लाख 54 हजार 446 इतकी मोठी जनावरे असून 1 लाख 73 हजार 507 इतकी लहान जनावरे आहेत तर एकूण जनावरांची संख्या ही 1 लाख 88 हजार 935 इतकी आहे. तर शेळीसाठी 99 हजार 100 इतका पीपीआर लसीचा साठा आहे. तर मोठ्या जनावरांसाठी म्हणजेच गाय, म्हैस या जनावरांच्या 77 हजार लसीचा साठा उपलब्ध आहे.