अहमदनगर : राज्यात कोल्हापूर (Kolhapur) व सांगली (Sangli) जिल्ह्यातील दूध संघ दुधाला लिटरमागे ३३ रुपये दर देतात. अहमदनगर जिल्ह्यातील उत्पादकांना मात्र खासगी दूध संघ केवळ २५ रुपये दर देत आहेत. एकाच राज्यात दुधाच्या दरांत (milk Rate) अशी तफावत असून, यामागचे गौडबंगाल काय? असा प्रश्न दूध उत्पादकांना पडला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar) सध्या दूध दर आंदोलनाने जोर पकडला आहे. श्रीरामपूर, संगमनेर येथे दुधाच्या प्रश्नावर मोठी आंदोलने झाली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही दुधाचा प्रश्न गाजला. जिल्ह्यात सध्या सहकारी तत्त्वावरील मोठे दूध प्रक्रिया प्रकल्प नाहीत. खासगी तत्त्वावरील मोठे प्रकल्प मात्र सुरू आहेत. खासगी संघ गायीच्या ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असलेल्या दुधाला अवघा २५ रुपये लिटर दर देतात. हे दर राज्य सरकारने निश्चित केलेल्या दरांहून दोन रुपयांनी कमी आहेत. राज्य सरकारने दुधाला लिटरमागे पाच रुपये अनुदानाचे वाटप सुरू केले असले तरी दूध उत्पादक तोट्यात आहेत.
कोल्हापूर, सांगलीत ३३ रुपये दर
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सहकारी दूध संघांकडून शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी लिटरमागे ३३ रुपये दर दिला जातो. तेथे म्हशीच्या दुधाचे खरेदी दर ५० रुपये आहेत. याशिवाय लिटरमागे एक रुपया याप्रमाणे दुधावर दिवाळीला बोनस दिला जातो. गोकुळ, वारणाच्या कार्यक्षेत्राबाहेरील दूध उत्पादकांनाही तेथे लिटरला २८ रुपये ५० पैसे दिले जातात. लोकमतने दोन्ही संघांशी संपर्क साधला असता ही माहिती मिळाली.
खासगी संघांवर कारवाई नाही ?
जिल्हा दुग्ध विकास अधिकारी गिरीश सोनवणे यांच्याशी 'लोकमत'ने संपर्क केला असता ते म्हणाले, 'राज्य सरकारने राबविलेल्या पाच रुपये दूध दर अनुदान योजनेसाठी निकष लावण्यात आलेले आहेत. त्यानुसार दूध संघांना २७ रुपये लिटरपेक्षा कमी दराने दूध खरेदी करता येत नाही. सहकारी दूध संघांनी जर यापेक्षा कमी दराने खरेदी केली तर कारवाईची तरतूद आहे. खासगी संघांबाबत मात्र कारवाईला मर्यादा आहेत. त्यांना फार तर पत्रव्यवहार करता येतात', दरम्यान, खासगी दूध संघाने २७ रुपयांपेक्षा कमी दर दिला तरी तेथे दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकार पाच रुपये अनुदान देते.
दूध पिशवीतील दर मात्र वाढीव
खासगी संघांचा मार्केटमध्ये दूध विक्रीचा दर लिटरमागे ६२ रुपयांपर्यंत आहे. दूध उत्पादकांना मात्र लिटरमागे अवघे २५ रुपये मिळतात. शिवाय दुधात भेसळही मोठ्या प्रमाणावर असल्याची प्रकरणे उघडकीस आलेली आहेत.
सहकारी संघ देतात २७ रुपये
अहमदनगर जिल्ह्यातील राजहंस, गोदावरी हे सहकारी दूध संघ शासकीय नियमाप्रमाणे लिटरमागे २७ रुपये दर देत आहेत. कोल्हापूर परिसरात म्हशीचे दूध जास्त आहे. त्यामुळे त्यांना जास्त दर देणे परवडते असे गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांचे म्हणणे आहे.