Agriculture News : एकीकडे तापमान (Temperature) वाढत असून माणसांसह जनावरांना देखील त्रास होऊ लागला आहे. तर वाढत्या उष्णतेमुळे गायींच्या दुधावर परिणाम होत असल्याने पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत संकरित गायींना (Cow Care Tips) थंड ठेवण्यासाठी येवला तालुक्यातील नांदूर येथील चेतन पुरकर या शेतकऱ्याने केला आहे.
मार्च महिना सुरू होताच पारा ३५ ते ३८ अंश सेल्सिअसापर्यंत गेला आहे. या उन्हाच्या झळा मनुष्याबरोबर सर्वांनाच बसू लागल्या आहेत. त्यामुळे कड़क उष्णतेपासून बचाव करण्यासाठी अनेक उपाय-योजना राबविल्या जात आहे. तसेच जनावरांसाठीही उष्णतेपासून बचावासाठी शेतकऱ्यांनी शक्कल लढवली आहे. पोल्ट्रीत पक्ष्यांना (Poultry Farm Fogger) थंड ठेवण्यासाठी फॉगरचा उपयोग (Fogger System In Gotha) केला जातो. त्याच फॉगरचा उपयोग गायींच्या गोठ्यात थंडावा मिळावा म्ह्णून करण्यात आला आहे.
पुरकर यांनी गोठ्यात चार ते पाच फॉगर लावले असून प्रत्येक जनावरासाठी एक फॉगरद्वारे दिवसभरात पाणी मारून उष्णतेपासून थंड ठेवले जाते. दिवसभरात तीन वेळेस २० लिटर पाणी फॉगरद्वारे मारून जनावरे थंड ठेवत आहे. फॉगरच्या वापरामुळे पाणीही कमी लागते आणि जनावरेही थंड राहतात. फॉगरमुळे धुके तयार होते आणि त्यामुळे वातावरणातील तापमान नियंत्रित राहते.
फॉगरचा वापर करण्याचे फायदे उन्हाळ्यात गाई-म्हशींना जास्त उष्णतेमुळे त्रास होतो आणि त्यांचे दुधाचे उत्पादन कमी होते. यावर उपाय म्हणजे फॉगरचा वापर करणे फायदेशीर ठरते. गाई आणि म्हशींच्या गोठ्यांसाठी फॉगरचा वापर केला जातो. गाई-म्हशींच्या शरीराचे तापमान कमी होते, गोठ्यात थंड तापमान राहते, वातावरणातील तापमान नियंत्रित राहते. फॉगरद्वारे पाणी मारल्याने जनावरांच्या शरीराचे तापमान ३० अंशांपर्यंत येण्यास मदत होते.
फॉगरचा वापर कसा करावा? छताच्या खालच्या बाजूला लॅटरल फिरवून प्रति गाय एक फॉगर या प्रमाणे बसविता येतात. सौर उर्जेवर चालणारे फॉगरही उपलब्ध आहेत. दिवसभरात तीन वेळा पाणी भरावे लागते. तर दिवसाला २० लिटर पाणी लागते.
सध्या ३५ ते ३८ अंश सेल्सिअस तापमान आहे. संकरित जनावरे उष्णतेत कमी खातात व इतरही त्रास होतो. दूधही कमी देतात. त्यांना ३० अंश सेल्सिअसपर्यंत थंड ठेवले जाते त्यामुळे ते खातात आणि दूधही देतात.- डॉ. दिगंबर गायकवाड, पशुसेवक, येवला