नुकताच ४ फेब्रुवारीला ‘जागतिक कर्करोग जागृती दिन’ साजरा केला गेला. खरंतर तो मानवातील कर्करोगाबाबत होता. आपल्या पशुधनांमध्ये देखील कर्करोग होतो. त्याबाबत विशेष करून पशुधनातील महत्त्वाच्या कर्करोगाची ओळख या माध्यमातून आपण करून घेऊ.
पशुधनातील कर्करोग ओळख
- कर्करोगाचे साधारण दोन प्रकार असतात. एक म्हणजे ‘सौम्य कर्करोग’ जो शरीरामध्ये इतरत्र पसरत नाही.
- दुसरा ‘घातक कर्करोग’ म्हणजे जो शरीरामध्ये वेगाने पसरतो.
- दोन्ही प्रकार हे पशुधनात आढळून येतात. पण गोवंशामध्ये त्याचे प्रमाण जास्त आहे.
- अनेक वेळा शरीरावर मोठ्या गाठी (आवळ) दिसतात. पशुधनाच्या सौंदर्यात बाधा आणतात.
- अनेक वेळा त्याचा परिणाम पशुधनाच्या हालचालीवर होऊ शकतो.
- अनियंत्रित वाढलेल्या गाठी या पशुधनाला वेदना देतात. त्यामुळे तात्काळ शस्त्रक्रिया करून या गाठी काढून टाकाव्यात.
- मोठ्या दुधाळ जनावरात मुख्यत्वे करून डोळे, शिंग, गर्भाशय, मोठे आतडे यांचा कर्करोग आढळतो.
- घरचे पाळीव प्राणी श्वान, मांजर यांच्यामध्ये विशेषतः तोंड, मलाशय, मूत्राशय कर्करोगाने बाधित होतात.
- जो अवयव बाधित होतो त्याच्याशी संबंधित लक्षणे दाखवली जातात.
१) शिंगाचा कर्करोग
- हा तसा नेहमी आढळणारा कर्करोग आहे. अनेक खिलार पशुपालकांनी याचा अनुभव घेतला आहे.
- गीर, डांगी, कांक्रज या देशी गोवंशात देखील हा रोग आढळून येतो.
- गोठ्यात गाय किंवा बैल दावणीवर शिंग आपटत असेल, वारंवार मान हलवत असेल.
- पायाने शिंगाला मारण्याचा प्रयत्न करत असेल, अनेक वेळा एकच शिंग कललेले आढळते.
- शेवटी शिंग मूळ जागा सोडून हलायला लागते. त्याच बाजूच्या नाकपुडीतून रक्तस्त्राव होतो.
- अशावेळी तात्काळ तज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने ते शिंग मुळापासून काढून टाकावे.
- शिंगाच्या मुळाशी घट्ट दोरी बांधणे, वारंवार घोळणे, रंगवणे, शिंगाला वारंवार खीळ बडवणे या कारणामुळे शिंगाचा कर्करोग होतो.
२) डोळ्याचा कर्करोग
- खिलार प्रजातीमध्ये नेहमी आढळणारा हा कर्करोग आहे.
- पापणी किंवा तिसरी पापणी यावर कर्करोगाची गाठ आढळून येते.
- अगदी लहान असतानाच नेमके निदान करून ती गाठ काढून टाकली की डोळा वाचवता येतो.
- पण उशीर केला, ती गाठ मोठी झाली की मात्र संपूर्ण डोळा काढायला लागतो.
- गाठ काढल्यावर पुन्हा देखील ती गाठ उद्भवू शकते. त्यासाठी पशुपालकांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
३) चामखीळ
- देखील विषाणूमुळे होणारा एक प्रकारचा कर्करोग आहे.
- कमी वयाच्या जनावरांमध्ये आढळतो. दुधाळ जनावरात देखील या प्रकारचा कर्करोग आढळतो.
- शरीरावर कुठेही चामखीळ येते. तात्काळ उपचार केल्यास त्या निघून जातात.
- पण सड, योनी, गुदद्वारा भोवती चामखीळ उद्भवल्यास जनावरांना खूप त्रास होतो.
- घरातील माशामुळे याचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
- शस्त्रक्रिया द्वारे त्या काढून टाकणे किंवा होमिओपॅथी औषधांचा दिर्घकाळ उपाय करून या रोगावर नियंत्रण मिळवता येते.
- सोबत गोठ्यातील माशा नियंत्रित केल्यास याचा प्रादुर्भाव रोखता येतो.
साधारण अशा प्रकारचे कर्करोग आपल्या पशुधनात आढळतात. त्यामुळे योग्य निदान करून आपल्याला त्यावर नियंत्रण मिळवता येणे येते हे निश्चित.
डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली
अधिक वाचा: पशुधनातील खच्चीकरणाचे महत्त्व काय? खच्चीकरण का आणि कशासाठी करायचे? वाचा सविस्तर