Livestock Census : राज्यात दर पाच वर्षांनी पशुगणना होत असते. तर यंदाची पशुगणना सप्टेंबर महिन्यात सुरू होणार असून त्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने जय्यत तयारी सुरू केली आहे. पशुगणना करण्यासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम जुलै महिन्यात पार पडला. सप्टेंबरपासून सुरू झालेली पशुगणना पुढील तीन ते चार महिने चालण्याची शक्यता आहे.
जनावरांमधील साथीचे रोग, रोगांवरील नियंत्रण करण्यासाठी सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या योजना आणि प्रकल्प, दुधाचे उत्पादन, दुधाच्या कमीजास्त होणाऱ्या किंमती, राज्यातील एकूण पशुधन आणि त्याचे व्यवस्थापन या सर्व गोष्टींसाठी पशुगणना महत्त्वाची असते. धोरण निश्चितीसाठी पशुधनाची योग्य माहिती जवळ असणे गरजेचे आहे. त्यामुळे दर पाच वर्षांनी देशभरातील पशुधनाची गणना करण्यात येते. २०१९ साली शेवटची म्हणजेच २० वी पशुगणना झाली होती. त्यानंतर यंदा २१ वी पशुगणना होणार आहे.
राज्यात पशुगणनेच्या क्षेत्रिय कामास १ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. त्यासाठी राज्य पशुगणना अधिकारी व जिल्हा पशुगणना अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले असून या काळात पशुगणना करण्यासाठी काही खासगी लोकांची नेमणूक करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना मोबाईल अॅपवरून पशुगणना करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
दरम्यान, २१ व्या पशुगणनेमध्ये एकूण २१९ पशुधनाच्या जातींची गणना होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया मोबाईल अॅपद्वारे केली जाणार आहे. त्याचबरोबर राज्यात यंदा विविध पशुरोगांचे मान्सून पुर्व लसीकरण जवळपास ९५ ते ९७ % पूर्ण झाले आहे. त्यामुळे यावेळी रोग प्रादुर्भाव नोंद झालेला नाही. यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी मोलाची कामगिरी बजावली अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.