लातूर : केंद्र शासनाच्या धोरणानुसार राज्यभरात नोव्हेंबरपासून सुरू असलेली २१ वी पशुगणना (Livestock Census) मोहीम अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यात ८७ टक्के कार्य पूर्ण झाले असून, लातूरचा पशुसंवर्धन विभाग राज्यात द्वितीय स्थानावर आहे. ८७ टक्के कार्य जिल्ह्यात मोहिमेची उद्दिष्टपूर्ती लवकरच झाले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसीय सात कलमी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील पशुगणना मोहीम (Livestock Census) अंतिम टप्प्यात आहे. पशुगणना ही पशुधनाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असते.
शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पशुपालकांना (Livestock) अनुदान तसेच विविध पशुसंवर्धन कार्यक्रमांसाठी अचूक माहिती मिळावी, यासाठी पशुगणना अनिवार्य आहे.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, तत्कालीन सीईओ अनमोल सागर, सीईओ राहुलकुमार मीना यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक पशुसंवर्धनचे सहआयुक्त डॉ. नाना सोनवणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर व त्यांच्या पथकाने प्रभावी कृती आराखडा तयार करून सतत दौरे, बैठकांद्वारे पशुपालकांना प्रोत्साहन दिले.
९९२ गावांत पशुगणना पूर्ण
जिल्ह्यातील ११३९ पैकी ९९२ गावांत पशुगणना (Livestock Census) पूर्ण झाली आहे. आतापर्यंत ४,८४,२८१ कुटुंबांची नोंदणी, ४,९५,४३६ पशुधन गणना, तसेच ६,२०,५२४ कोंबड्यांची नोंदणी करण्यात आली आहे. उर्वरित १४७ गावांतील पशुगणना २८ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
पशुपालकांचे सहकार्य...
पशुगणनेसाठी पशुपालक, पर्यवेक्षक, प्रगणकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गावागावांत बैठकांद्वारे पशुपालकांना पशुगणनेचे महत्त्व पटवून देण्यात आले. पशुपालकांनी गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे.
पशुगणना मोहीम अंतिम टप्प्यात आली आहे. सध्या लातूर राज्यात द्वितीय स्थानावर आहे. प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पशुपालक, ग्रामस्थ, पर्यवेक्षक व प्रगणकांनी सहकार्य करावे. - डॉ. श्रीधर शिंदे, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन.
हे ही वाचा सविस्तर : Bird flu: 'बर्ड फ्ल्यू'मुळे धाराशिव जिल्ह्याची यंत्रणा 'हाय अलर्ट मोड'वर!