Pune : दर पाच वर्षांनी पार पडणारी पशुगणना यावर्षी अखेर २५ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरू झालेली पशुगणना तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली होती. निवडणुका पार पडल्यानंतर आता नव्या दमाने पुन्हा पशुगणनेला सुरूवात झाली आहे. पण विशेष म्हणजे ही पशुगणना इतर पशुगणनेपेक्षा वेगळी असणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागाचा राज्यातील एकूण उत्पनातील वाटा हा अडीच टक्के एवढा असून कृषी क्षेत्रातील उत्पन्नाशी तुलना केली तर तब्बल २४ टक्के वाटा आहे. केंद्र सरकारकडून दर पाच वर्षात देशातील पशुंची गणना केली जाते. मागील म्हणजे २०२९ सालच्या पशुगणनेत ३ कोटी जनावरांची नोंद झाली होती. सध्या सुरू असलेली २१ वी पशुगणना असून या पशुगणनेसाठी पहिल्यांदाच मोबाईल अॅपचा वापर केला जाणार आहे. त्याबरोबरच गोवंश आणि म्हैसवर्गीय जनावरांना एअर टॅगिंग केले जाणार आहे.
पशुगणनेची वैशिष्ट्ये
- पशुगणनेसाठी पहिल्यांदाच होणार मोबाईल अॅपचा वापर
- १६ प्रकारच्या जनावरांची केली जाणार गणना
- ग्रामीण ते शहरी भागापर्यंत ७ हजार ५०० प्रगणकांची नेमणूक
- मागच्या पशुगणनेत ३ कोटी जनावरांची नोंद
- प्रगणकामध्ये जनावराचे ब्रीड, लिंग व वय याची नोंद केली जाणार
- गोवंश आणि म्हैसवर्गीय जनावरांना टॅगिंग केले जाणार
- टॅगिंगमुळे थेट पशुधन अॅपमध्ये नोंद होणार, एकत्रित माहिती मिळण्यास मदत होईल
- रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्रे व मांजरांचीही होणार नोंद
- सर्व गोशाळांपर्यंत जाऊन गोशाळांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
- सर्व पशुगणकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे
- भटकंती करणाऱ्या पशुपालकांच्या पशुंचीही होणार गणना
- भटक्या पशुपालकांच्या पशुगणनेसाठी विशेष नियोजन
ही पशुगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार असल्यामुळे डाटा थेट केंद्राच्या पशुसंवर्धन विभागाच्या पोर्टलवर नोंद होणार आहे. यावेळी गोवंश आणि म्हैसवर्गीय जनावरांना एअर टॅगिंग करण्यात येणार असल्याने शेतकर्यांना अनुदान आणि इतर योजनांचा लाभ घ्यायला मदत होणार आहे. पशुगणनेसाठी जे प्रगणक आपल्या घरी येतील त्यांना शेतकऱ्यांनी आपल्या पशुंची अचूक माहिती द्यावी.
- डॉ. प्रविणकुमार देवरे (आयुक्त, पशुसंवर्धन)