Join us

पशुपालकांनो तुमच्या वासरांचे हेल्थ कार्ड बनवा; होईल मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 4:47 PM

वासराच्या वंशावळीपासून ते वेतापर्यंत सर्व अचूक माहिती दर्शविणारे हेल्थ कार्ड म्हणजे जणू त्या वासराचा दाखला. ज्याचा शेतकर्‍यांना वेळोवेळी मोठा फायदा होतो. त्यामुळे वासराचे हेल्थ कार्ड सर्वांनी तयार करावे. त्या विषयीचा हा लेख.

रविंद्र शिऊरकर 

शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. आज राज्यात जवळपास  १.४० कोटी गाई आहेत. दूधव्यवसाय करतांना गाईसोबत तिच्या कालवडींचे संगोपन देखील महत्वाचे आहे. कारण आजची कालवड म्हणजेच उद्याची गाय असते. तेव्हा या कालवडींचे संगोपन करतांना त्या-त्या वेळी वासराचे हेल्थ कार्ड (सर्व घटकांची नोंद असणारा दाखला) तयार करणे हे देखील खूप गरजेचे आहे. ज्यामुळे भविष्यात जेव्हा कालवडीचे रूपांतर गाईत होते तेव्हा तिची वंशावळ, दूध उत्पादन, लसीकरण, वय, वेत, आदींची योग्य माहिती आपल्याला असते. 

आपल्याकडील नोंद वहीत किंवा तत्सम जागी जन्मापासून सर्व नोंदी असणे म्हणजेच एकप्रकारे वासराचे हेल्थ कार्ड होय. या हेल्थ कार्ड मध्ये विविध नोंदी करतांना त्यात पुढीलप्रमाणे सर्व मुद्दे नमूद असायला हवे.   

जन्मलेल्या वासराचे जन्म दिनांक व वजन

वासराचे जन्म झाल्याचा दिनांक व त्यावेळीचे वजन याची सर्वात आधी नोंद करणे. यामुळे दिवसेंदिवस वासराचे वजनात किती वाढ होत आहे हे तपासणे सोपे जाते. तसेच जन्म तारखेमुळे योग्य वय समजण्यास मदत होते.   

कालवड माजावर आल्यावेळेचे वय व वजन 

वासरांचे योग्य संगोपन झाल्यास ते वेळेत १२ ते १४ महिन्यांच्या कलावधीत पहिल्यांदा माजावर येतात. त्यावेळी त्यांचे वजन योग्य असल्यास त्यांचे रेतन करता येते. तसेच योग्य वजन असल्यास पुढे त्यांच्या वासरांची आरोग्य देखील व्यवस्थित राहते.  

कृत्रिम रेतन केल्याची नोंद दिनांक 

आपल्याकडील कालवड किती महिन्यांची गाभण आहे हे अचूक माहिती असणे गरजेचे असते. ज्यामुळे पहिले तीन महीने, नंतर सात महिन्यापर्यंतचा कालावधी व पुढे शेवटचे दोन महीने योग्य आणि पूरक खाद्य व्यवस्थापन करण्यास मदत होते. याकरिता हेल्थ कार्ड खूप मदत करते. म्हणून जेव्हा आपण आपल्याडील वासराचे पहिल्यांदा कृत्रिम रेतन करतो तेव्हापासून ते पुढील सर्व वेताच्या रेतणांची नोंद करणे देखील गरजेचे आहे. 

घराची गाय तयार करायची आहे मग हे नियोजन पाळा; कालवड संगोपन 

गाय/म्हैस व्याल्याची दिनांक 

कृत्रिम रेतन सोबतच ते वेत जेव्हा संपते म्हणजेच गाय/म्हैस ची प्रसूती होते तो दिनांक देखील या हेल्थ कार्ड मध्ये असणे गरजेचे आहे. ज्यामुळे अनेकदा गाई म्हशींची विक्री करतांना खरेदीदारांस योग्य वेत सांगणे व त्याला हेल्थ कार्ड दाखवत ती नोंद पटवणे सोपे आहे. 

दूध उत्पादन 

एका वेतात सरासरी दिवसाला किती दूध उत्पादन झाले यांची नोंद करणे देखील गरजेचे आहे. यातून पुढच्या वेतात गाईचे दूध किती वाढले याचा हिशोब कळतो. तसेच दररोजच्या दूध उत्पादनातून एका वेताचे सरसरी दूध उत्पादन देखील समजते.

वासरांचे पितृत्व व मातृत्वाची वंशावळ 

पितृत्व व मातृत्वाची वंशावळ म्हणजेच आई वडिलांची माहिती होय. ज्यात वासरच्या आईचे व वासरच्या वडिलांच्या आईच्या दूध उत्पादनाची नोंद, त्यांचा वर्ण, वंश, तसेच त्यांच्या निरोगी आयुष्याबाबत माहिती. 

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधगायशेतीशेतकरी