सकाळ संध्याकाळ वैरण टाकणे धारा काढणे, आणि आपल्या सवडीनुसार गुरांना पाणी पाजणे. हा नियमित दिनक्रम अनेक पशुपालक करतात. मात्र या पलीकडे जाऊन एका जनावराला दिवसाकाठी किती पाणी हवे ? ते जनावर तेवढे पाणी पिले का? याचा कोणताही पशुपालक विचार करताना दिसत नाही. याचे कारण म्हणजे पशुधनाच्या व्यवस्थापना संदर्भात न झालेली जनजागृती तसेच पशुपालकांनी या संदर्भात पशुवैद्यकास कधीही न विचारणे होय.
मानव तहान लागली की पाणी पितो मात्र गुरांना आपण बांधून टाकत असल्याने त्यांना हवं तेव्हा पाणी पिता येत नाही. ज्यामुळे ते पशुपालकांवर अवलंबून असतात. मात्र असे न करता जनावरांच्या गव्हाणीच्या आजूबाजूला पाणी ठेवावे जेणेकरून त्यांना हवे तेव्हा ते पिऊ शकतात.
तसेच सध्या उन्हाच्या तीव्र झळा बसत असल्याने तसेच पाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था नसल्यास दर दोन ते तीन तासांनी स्वच्छ आणि थंड पाणी जनावरांना पिण्यास द्यावे. तसेच शक्य असल्यास आठवड्यातून एक दोनदा गूळ मिश्रित पाणी पिण्यास द्यावे. पाण्याची टाकी किंवा हौद असल्यास त्याला स्वच्छ ठेवावे. शेवाळ किंवा जंतु त्यात होऊ देऊ नये.
गुरांना ते खात असलेल्या वैरणीच्या तुलनेत दोन पट पाणी हवे असते. त्यामुळे वेळोवेळी त्यांना पिण्यायोग्य पाणी द्यावे. आजकाल अनेक पशुपालक शेतकरी पशुधंनासाठी मुक्तसंचार गोठा करत आहे. यात पिण्याच्या पाण्यासाठी एक हौद केल्यास त्याद्वारे गुरे हव तितके पाणी त्यांच्या गरजेनुसार पिऊ शकतात.
मानवी गरजेप्रमाणेच गुरांना देखील स्वच्छ आणि थंड पाण्याची गरज असते. ज्यामुळे त्यांचे आरोग्य संतुलित राहून त्यांच्या मार्फत पशुपालकांस दुधाचे, मशागतीचे उत्पादन घेता येते.