सागर कुटे
उन्हाळ्याची चाहूल लागल्यावर पाण्याचे स्रोत कोरडे पडू लागले आहेत. त्यात यंदा चाऱ्याची टंचाई अधिक तीव्र झाली आहे. परिणामी, चारा महागला आहे, ज्यामुळे पशुपालनासाठी लागणारी संसाधने कमी होत आहेत.
यामुळे अनेक पशुपालक पशुधन खामगाव येथील गुरांच्या बाजारात (Market) विक्रीसाठी आणत आहेत. विशेष म्हणजे, बैलांच्या संख्येत घट होत असून, बैलजोडीची किंमत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे.
पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या घरी बैलजोडी सहजपणे दिसायच्या. आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठे बदल झाले आहेत.
बैलजोडीच्या कमी होणाऱ्या संख्या व महागाईमुळे शेतकरी दुहेरी संकटांचा सामना करत आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे शेतकऱ्यांचा दारात खंडीभर बैलजोडी बांधलेल्या दिसत होत्या.
बैलजोडीची किंमत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर
गुरुवारी बाजारात गुरांची आवक
बैल | ४२९ |
म्हैस | ५४५ |
रेडा | १० |
बकरी | ५२८ |
बोकड | ५० |
मेंढी | २० |
बैलजोडीची किंमत लाखात
* खामगाव येथील बैल बाजार प्रसिद्ध आहे. या बाजारात आजूबाजूच्या जिल्ह्यांसह मध्य प्रदेशातून व्यापारी, शेतकरी बैलजोडी, म्हैस व इतर जनावरे विक्री व खरेदी करण्यासाठी येतात.
* बैलजोडीच्या किमतीत वाढ झाली आहे. साधारणतः एका चांगल्या बैलजोडीची किंमत लाखात आहे. स्थितीनुसार किमतीमध्ये चढ-उतार दिसत आहे.
* २ हजार रुपये दराने पशुपालकांना तुरीचे कुटार खरेदी करावे लागत आहे. त्यासोबतच मका पिकाच्या कुटाराचे दर १५०० रुपये एकरी आहे.
पारंपरिक शेती बरोबरच शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय उभारणी केल्याशिवाय पर्याय नाही. हे जरी सत्य असले तरी व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक अडचणी आहेत. शासनाने आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. -पंडित मानकर, शेतकरी, ढोरपगाव
पूर्वी बैल चराईकरिता मजूर मिळत होते. आता मजूर मिळत नाहीत. पीक उत्पादनात कमालीची घट झाली आहे. उत्पादन खर्च निघत नाही. त्यात चाराही महागला आहे. शेतात यंत्राचा वापर होत असला तरी अनेक कामे बैलजोडीच्या साह्यानेच करता येतात. - भाऊराव घोराळे, शेतकरी, ढोरपगाव
यंदा तूर पिकाचे कुटार महागले आहे. सोबत इतर पिकांचा चारा मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे चाराटंचाई निर्माण झाली आहे. वाढत्या महागाईच्या वणव्यात पशुपालन करणे कठीण झाले आहे.- विजय सातव, शेतकरी, पिंपळगावराजा