बदलत्या वातावरणाचा परिणाम जसा मानवी आरोग्यावर होत असतो तसाच तो पशुधनाच्या आरोग्यावरही देखील होतो. पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढल्याने वातावरण अनेक सूक्ष्मजीवाणूच्या वाढीसाठी अनुकूल असते.
परिणामी पावसाळ्यात विविध साथींच्या आजारांची लागण होते आणि त्याची तीव्रता जास्त झाल्यास जनावरे दगावण्याचा धोका सर्वाधिक असतो. ज्यामुळे त्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसानदेखील होऊ शकते.
या बदलत्या वातावरणाशी सामना करण्यासाठी पावसाळ्यामध्ये पशुधनाचे साथीच्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी मान्सून पूर्व लसीकरण करून घेणे गरजचे आहे.
पावसाळ्यामध्ये गायी-म्हशींसह इतर सर्व पशुधनांचे साथीच्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी मान्सून पूर्व लसीकरण करून घेण्यासाठी शासकीय पशू वैद्यकीय केंद्रात या संबंधित सर्व लस नाममात्र शुल्कात उपलब्ध आहेत. त्याचा पशुपालकांनी लाभ घेत आपल्या पशुंची काळजी घ्यावी.
कोणकोणती लस दिली जाते?- सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु होत आहेत. या दिवसात संभाव्य उद्भवणारे आजार लक्षात घेता पशुसंवर्धन विभाग पशुंच्या आरोग्याच्या दृष्टीने तत्पर राहते.- पावसाळा सुरू होत असताना अथवा पावसाळ्यानंतर मोठ्या जनावरांना जसे की गाई-म्हशी यांच्यामध्ये घटसर्प तसेच एकटांग्यासारखे आजार उद्भवत असतात.- त्यामुळे घटसर्प, फऱ्या व लम्पी स्कीन, पीपीआर लस जनावरांना दिली जाते.
लस कुठे मिळेल? मान्सूनपूर्व लसीकरण सध्या गावागावांतील पशुसंवर्धन विभागात पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे उपलब्ध आहे. पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आपल्या जनावरांचे लसीकरण करून घ्यावे.
अधिक वाचा: Rabies पिसाळलेला कुत्रा जनावरांना चावला तर काय होऊ शकते?