Join us

'पशु किसान क्रेडिट कार्ड मधून मिळणार दीड लाखापर्यंत कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2023 2:31 PM

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करणार?, लाभ घेण्याचे आवाहन

शासनाकडून शेतीसाठी जसे किसान क्रेडिट कार्ड आहे त्याच पद्धतीने पशू किसान क्रेडिट कार्ड योजना आहे. या माध्यमातून नवीन जनावरे घेण्यासाठी कर्ज मिळत नाही. तर ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे आहेत. त्यांच्या पालनपोषणासाठी (चारा, उपचार, देखभाल तसेच व्यवस्थापनासाठी) दीड लाखापर्यंत कमी व्याजदरात कर्ज मिळते. पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी पशू किसान क्रेडिट कार्डची सुरुवात करण्यात आली आहे.

या योजनेसाठी पशुपालन करणारा शेतकरी, पशुधन मालक यासारख्या व्यक्तींना पशु किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करता येतो. १ एप्रिल ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत एकूण ४७८ शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डचा फायदा?

पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकरी किंवा कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यामधून शासनाकडून २ टक्के सूट दिली जाते. जर कर्जदाराने कर्जाची नियमित परतफेड केली तर त्यातून पुन्हा २ टक्के सूट मिळते. म्हणजे २ टक्के दरानेच लाभार्थ्यास कर्ज उपलब्ध होते. किसान क्रेडिट कार्डचा शेतकऱ्यांना मोठा फायदा आहे.

पशुसंवर्धनासाठी इतकं मिळणार कर्ज ?

पशु किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकयांना जास्तीत जास्त दीड लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये एका म्हशीसाठी ३० हजार रुपये, एका गायीसाठी ३० हजार रुपये, १० शेळ्यांच्या एका गटासाठी २० हजार तसेच १०० कोंबड्यांसाठी ५ हजार रुपये इतकं कर्ज पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून देण्यात येते.

पुणे जिल्ह्यातील गावागावांतील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड योजनेचे अर्ज उपलब्ध आहेत. तसेच या योजनेबाबत गावातील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. विष्णू गर्जे, पुणे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड कसं आणि कुठं काढणार?

पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेत जाण्याची गरज नाही. आपल्या गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यात छापील अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. तेथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. तसेच आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह गावातील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सादर करावा. तेथून पुढील प्रक्रिया झाल्यानंतर जिल्हा स्तरावरून ते अर्ज लीड बँकेमार्फत लाभधारक शेतकऱ्यांना पशुसंवर्धन किसान क्रेडिय कार्ड योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. अर्जदार बँकेचा थकीत कर्जदार असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

टॅग्स :शेतकरीदुग्धव्यवसायसरकारी योजना