Join us

लम्पी परत आलाय, पशुधन वाचविण्यासाठी काय कराल

By बिभिषण बागल | Published: August 17, 2023 12:00 PM

पशुपालकांनी रोगी जनावरांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व आपले पशुधन वाचवण्यासाठी जनावरांची काळजी घेणे आवश्यक आहे.

गोवंशातील जनावरांमध्ये लम्पी आजाराची साथ चालू झाली आहे. लम्पी आजाराच्या तीव्रतेनुसार बाधित जनावरांमध्ये विविध लक्षणे आढळून येत आहेत. हा आजार विषाणूजन्य असल्याने त्यावर १०० टक्के प्रभावी औषधोपचार उपलब्ध नाही. मात्र शेतकऱ्यांनी ज्या जनावरांवर तत्काळ योग्य उपचार करून घेतला व चांगली काळजी घेतली आहे ती जनावरे बरी होत आहेत. सर्वसामान्यपणे रोगातून बरे होणाऱ्या जनावरात ८० टक्के सुश्रुषा अथवा निगा व २० टक्के औषधोपचाराचा वाटा दिसून येत आहे. म्हणून पशुपालकांनी रोगी जनावरांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व आपले पशुधन वाचवण्यासाठी जनावरांची काळजी घेणे आवश्यक आहे.

आहार विषयक काळजी१) रोगी जनावरांची प्रतिकारशक्ती उत्तम राहण्यासाठी संतुलित आणि सकस आहार नियमित देण्यात यावा. त्याचप्रमाणे त्यांचा आहार व पाणी पिणे जास्तीत जास्त राहील यासाठी पशुपालकांनी काळजी घ्यावी.२) आजारी जनावराना हिरवा, मऊ व लुसलुशीत चारा तसेच चांगल्या प्रतीचा प्रथिन व उर्जायुक्त खुराक (भरडा/पशुखाद्य/ मका आदी) द्यावा. पिण्याचे स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात दिवसातून ४-५ वेळा उपलब्ध करून द्यावे. पाण्यामध्ये मीठ व गुळ टाकून दिल्यास जनावर पाणी आवडीने पितात तसेच त्यांना खनिजक्षार व उर्जा मिळेल. थंडीच्या काळात हलके कोमट पाणी दिल्यास जनावर आवडीने पाणी पितात. पाणी पिणे चालू राहील्यास अत्यवस्थ जनावर सुध्दा बरे होत आहेत.३) ज्या बाधित जनावरांना मानेवरील व छातीवरील सुजेमुळे मान खाली करता येत नाही अशा जनावरांना चारा व पाणी तोंडाच्या उंचीवर उपलब्ध करून देण्यात यावे. गरजेप्रमाणे चारा हातानी खाऊ घातल्यास रोगी जनावर चारा खात असल्याचे दिसून आले आहे.४) जनावरे आजारातून बरी होईपर्यंत त्यांना जीवनसत्वे, प्रतिकारक शक्ती वर्धक तसेच यकृतवर्धक औषधे नियमितपणे देण्यात यावीत.५) आजारी जनावरांना औषधे पाजणे शक्यतो टाळावे. पावडर किंवा पातळ औषधे ही कणीक/पीठ/गुळ खुराक किंवा पाण्यातून देण्यात यावीत.

उबदार निवारा विषयक काळजीहिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर आजारी जनावरांचे थंडीपासून संरक्षण करावे. जनावरे रात्रीच्या वेळी उघड्यावर बांधू नये. त्यांना कोरडा व उबदार निवारा उपलब्ध करून देण्यात यावा. लहान वासरांच्या अंगावर उबदार कपडे पांघरावीत. गोठ्यात अधिक तीव्रतेचे बल्ब लावावेत जेणेकरून उष्णता निर्माण होईल व प्रतिकूल वातावरणामुळे येणारा ताण टाळता येईल.

जनावरांच्या पोळी-पायावरील सुजेवर शेक देणे१) ज्या जनावरांना पाया समोरील लसीका ग्रंथीवर, पायांवर किंवा छातीवर सूज आहे अशा जनावराना बसताना त्रास होतो म्हणून अशी जनावरे बरीच दिवस उभीच राहतात. अशा जनावरांना मिठाच्या गरम पाण्याचा सुती कापडाच्या सहाय्याने दिवसातून २ वेळा उत्तम शेक द्यावा तसेच मॅग्नेशियम सल्फेट (बारीक पावडर) आणि ग्लीसरीन या संयुगाचा लेप सुजेवर सकाळ संध्याकाळी लावल्यास सूज कमी होण्यास मदत मिळते.२) अंगावरील गाठी व सूज कमी करण्यासाठी उन्हाच्या वेळेत गरम पाण्याची अंघोळ (शेकत/अंग चोळत) घालावी व अंग कापडाने कोरडे करावे म्हणजे सर्दी होणार नाही.३) लहान वासरांना चेहऱ्यावरील दुखणाऱ्या गाठीमुळे तोंडाची हालचाल करण्यास अवघड झाल्याने दुध पिता येत नाही. त्यासाठी चेहऱ्यावर गरम पाण्याने सुती कापडाच्या सहाय्याने शेक द्यावा.४) शेक देताना जनावरांना गरम पाण्याचा चटका बसणार नाही याची पशुपालकांनी खबरदारी घ्यावी.

बसू पडलेल्या (बसलेल्या/न उठणाऱ्या) जनावराची काळजी१) पायावरील सुजेमुळे उभे राहण्यास शक्य नसल्याने किंवा अशक्तपणामुळे रोगी जनावर बसू पडते.२) बसू पडलेल्या जनावरांना सिमेंट काँक्रीटची जमीन टाळावी. अंगाखाली मऊ गवत/तुसाची गादी करावी.३) दर २-३ तासानी जनावराची बाजू /कूस बदलावी. दिवसातून दोन वेळा मदतीने उभे करावे. पाय चोळावेत/शेकावेत.

तोंडातील व्रणोपचार/नाकाची स्वच्छता/डोळे याबाबत घ्यावयाची काळजी१)  जनावराच्या विशेषत: लहान वासरांच्या तोंडात जखमा आढळून आल्यास, तोंड पोटॅशियम परमगनेटच्या  द्रावणाने धुवून दिवसातून ३-४ वेळेस बोरो ग्लिसरीनचे द्रावण तोंडातील जखमांवर लावावे. त्यामुळे जनावराला चारा खाण्यास / वासरांना दुध पिण्यास त्रास होणार नाही.२) रोगी जनावराच्या विशेषतः लहान वासरांच्या नाकामध्ये बऱ्याचवेळा अल्सर/जखमा निर्माण होतात, नाक चिकट स्वायानी भरलेले असते. काही वेळा तो घट्ट व कडक होतो. त्यामुळे श्वसनास त्रास होतो. त्यासाठी कोमट पाण्याने नाकपुडी नियमितपणे स्वच्छ करावी. तसेच दोन्ही नाकपुड्यात बोरोग्लिसरीन अथवा कोमट खोबरेल तेल व बोरीक पावडरचे मिश्रण चार-चार थेंब टाकावे जेणेकरून मऊपणा टिकून राहील, जखमा भरून येतील व श्वसनास त्रास होणार नाही.३) सर्दी असेल तर निलगीरीच्या तेलाची किंवा विक्सची वाफ दिली तर चांगला फायदा होतो.४) डोळ्यात व्रण असतील तर डोळ्यातून पाणी येते व पुढे पांढरेपणा येतो. त्यासाठी डोळे बोरिक पावडरच्या द्रावणाने, नियमीत धुवून घ्यावेत किंवा कोमट पाण्याने साफ करावेत.

बैलांची काळजीरोगातून बरे झालेल्या बैलांना कामास जुंपल्यामुळे रोग प्रकोप होवून दगावत आहेत म्हणून प्रकृती ठणठणीत होईपर्यंत त्यांना काम लावू नये.

जखमांचे व्यवस्थापनबाधित जनावरांमध्ये २-३ आठवड्यानंतर प्रामुख्याने सूज आलेल्या भागात विशेषत: पायावर जखमा होतात. त्याचप्रमाणे शरीरावरील गाठी फुटून सुद्धा जखमा होतात. त्या जखमांवर खालीलप्रमाणे उपचार करावा.१) जखमा ०.१ टक्के पोटॅशियम परम्यांगनेटच्या द्रावणाने धुवून घेतल्यानंतर त्यावर पोव्हेडीन आयोडीन किंवा टिंक्चर आयोडीन लावावे. त्यानंतर जखमेवर मगनेशियम सल्फेट व ग्लिसरीनचे मिश्रण लावून बँडेजने हळुवारपणे बांधावी.२) सोबत जखमांवर माश्या व इतर बाह्यपरजीवी बसू नयेत यासाठी दिवसातून दोन वेळा हर्बल स्प्रे जखमांवर  फवारावा.३) जखमेमध्ये अळ्या पडल्यास अशा जखमेत टरपेनटाईनच्या तेलात भिजवून कापसाचा बोळा ठेवावा आणि त्यानंतर मृत अळ्या बाहेर काढून घ्याव्यात, अशा जखमांवर दिवसातून दोन वेळा हर्बल स्प्रे फवारण्यात यावा.४) जखमा जास्त खोल व दूषित प्रकारच्या असल्यास हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर करून अशा जखमांचा उपचार पशुवैद्यक अधिकाऱ्‍यांकडून करून घ्यावा.५) जखमा पूर्णपणे बऱ्या होण्यासाठी नियमित ड्रेसिंग करणे गरजेचे आहे.

गोमाशांचा/गोचिड यांचा उपद्रव व नियंत्रणरोगी जनावर सुस्त झाल्याने तसेच अंगावरती जखमा झाल्याने माशा बसतात व जनावर त्रस्त होते. म्हणून रोगी जनावरांना गोचीड-गोमाश्या यांचा त्रास कमी होण्यासाठी गोठ्यात दर ३-४ दिवसानी कीटकनाशक औषधांची फवारणी करण्यात यावी. तसेच अंगावर हर्बल/वनस्पतीजन्य किटकनाशक औषधीचा नियमित वापर करावा. यासाठी एक लिटर पाण्यामध्ये १० मिली निंबोळी तेल, १० मिली करंज तेल, १० मिली निलगीरी तेल आणि २ ग्रॅम अंगाचा साबण मिसळावे व हे मिश्रण फवारणीसाठी वापरावे.

वरीलप्रमाणे बाधित जनावरांच्या उपचारादरम्यान पशुपालकांनी आपल्या जनावरांची काळजीपूर्वक सुश्रुषा केल्यास पशुधन लम्पी आजारापासून वाचविण्यात उत्तम यश मिळू शकते.

रणजित पवार 

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतकरीगायशेतीडॉक्टर