राज्यात गोवंशीय जनावरांमध्ये लम्पी त्वचारोगाचा पुन्हा उद्रेक झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. १ एप्रिल ते १ ऑगस्टपर्यंत ५२ हजार जनावरे बाधित झाली असून त्यापैकी चार हजार चारशे जनावरांचा यामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २०२ मृत जनावरांच्या पशुपालकांना ४१ लाख ६० हजारांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. या रोगाला अटकाव करण्यासाठी लसीकरणाचा दुसरा टप्पा देखील जवळपास पूर्ण करण्यात आले असून आतापर्यंत ९८ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात गाभण जनावरे व वासरांमध्ये लसीकरण करण्यात आले नाही. यामुळे आता लम्पीचा प्रादुर्भाव मुख्यत्वे या दोन गटांमध्येच आढळत आहे. त्यामुळेच राज्य सरकारने लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू केल्यानंतर या गटामध्येही लसीकरण केले आहे.
२०२ पशुपालकांना मिळाली भरपाईया चार महिन्यांमध्ये राज्यात ५२ हजार १६७ जनावरे या रोगामुळे बाधित झाले असून ४ हजार ४०६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक ६९० मृत्यू कोल्हापूर जिल्ह्यात झाले असून नांदेड जिल्ह्यात ५५७, परभणी ५५२, सोलापूर ५५१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत जनावरांपैकी ४ हजार ३५३ जनावरांच्या मृत्यूची पडताळणी पूर्ण झाली आहे. त्यापैकी अनुदानासाठी ७९९ प्रस्ताव संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाले आहेत. यातील ४१४ प्रकरणे मंजूर करण्यात आली असून २०२ मृत जनावरांच्या अनुदानापोटी २०२ पशुपालकांना सुमारे ४१ लाख ४० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.
४ महिन्यांत १ कोटी ३६ लाख जनावरांचे लसीकरण१ एप्रिलपासून गेल्या चार महिन्यांमध्ये एकूण १ कोटी ३९ लाख ९२ हजार ३०४ जनावरांपैकी १ कोटी ३६ लाख ७२ हजार ७२१ अर्थात ९७.७ टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. नाशिक विभागात ९९.२, पुणे ९८.३, औरंगाबाद ९८.६ तर लातर विभागात ९६.१ टक्के लसीकरण झाले आहे.
३८ हजार मृत जनावरांपोटी अनुदानऑगस्ट २०२२ पासून ३१ मार्च २०२३ पर्यंत राज्यात ३८ हजार २२७ जनावरांचा या रोगामुळे मृत्यू झाला. राज्य सरकारने आतापर्यंत ३८ हजार १९ मृत जनावरांपोटी पशुपालकांना ९२ कोटी २९ लाख रुपयांचे अनुदान वाटप केले आहे. तर २०८ प्रकरणे फेटाळण्यात आली आहेत.
राज्यातील सर्वाधिक १० बाधित जिल्हे
जिल्हा बाधित लसीकरण (टक्क्यांत)कोल्हापूर ८४९५ ९५नांदेड ४१६४ ८७सोलापूर ५७२५ ९५परभणी २८२९ ९७बीड ३६९४ ९९लातूर २८८१ ७४सांगली ४०९५ ९४नगर २६४१ ९६हिंगोली २०७७ ९३जळगाव १७५६ ९४