पशुपालक मंडळीं आपले पशुधन मागील दोन वर्षात या लंपी चर्म रोगाला मोठ्या प्रमाणात बळी पडले आहे. जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागासह दूध संघ, सेवाभावी संस्था, सेवादाते यांनी मोठ्या प्रमाणात लसीकरणासह जनजागृती केली होती.
सन २०२३-२४ मध्ये जिल्ह्यातील ९,८३१ गोवर्गीय जनावरांना लंपी चर्मरोगचा प्रादुर्भाव झाला होता. या पैकी १,०१६ गोवर्गीय जनावरे ही मृत्युमुखी पडली होती. जवळजवळ लागण झालेल्या जनावरांपैकी १०.३३% जनावरे ही मयत झाली. एकूण ३,२४,७५६ गोवर्गीय जनावराच्या तुलनेत ०.३१ % मृत्यू झाले आहेत हे वास्तव आहे.
या रोगाचा प्रसार परजीवी कीटक विशेष करून डास, गोचीड, गोमाश्या, घरातील माशा याद्वारे होतो. सोबत मग बाधित जनावरांच्या नाकातील, डोळ्यातील स्त्रवाने दूषित झालेल्या चारा पाणी यामुळे देखील या रोगाचा प्रसार होतो. आता पावसाळा सुरू झाला आहे.
अनेक ठिकाणी दलदल, पाण्याची डबकी, दमट वातावरण हे निर्माण होणार आहे. श्रावण महिन्यात ऊन-पाऊस असे वातावरण तयार झाले की मग डास, गोचीड, गोमाशा यांच्या संख्येत वाढ होऊन जर एखादे जनावर या रोगांनी बाधित झाले तर त्या रोगाचा प्रसार वेगाने व्हायला वेळ लागणार नाही. त्यासाठी सर्वांनी काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.
आजाराची लक्षणे- आजाराची लक्षणे सुद्धा खूप वेगवेगळे असतात. एका जनावरात सगळी लक्षणे दिसतीलच असे नाही.- एकदा का या रोगाचा विषाणूने शरीरात प्रवेश केला की चार दिवसापासून पाच आठवड्यापर्यंत केव्हाही लक्षणे दिसायला सुरू होतात.- त्यामध्ये शरीराचे तापमान वाढते, भुक मंदावते, दूध उत्पादन कमी होते लसिका ग्रंथी सुजतात, नाका डोळ्यातून स्त्राव येतो, शरीरावर एक ते पाच सेंटीमीटर व्यासाच्या गाठी तयार होतात.- अनेक वेळा खोल मांसापर्यंत त्या जातात. तोंडातील भाग, श्वासनलिका या ठिकाणी गाठी व अल्सर तयार होतात.- अनेक वेळा डोळ्यात देखील अल्सर तयार होऊन अंधत्व येऊ शकते. गाठी फुटून जखमा होतात. जनावरे लंगडतात.- त्यामुळे वेळेत योग्य उपचार नाही मिळाले तर जनावरे मृत्युमुखी पडतात.
उपाययोजना- लसीकरण हा एकमेव उपाय आहे. सर्वांनी लसीकरण करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.- ही लस खरंतर गोट फॉक्स (शेळ्यातील देवी) या रोगासाठी वापरली जाणारी लस या रोगावर प्रभावी ठरल्यामुळे वापरली जाते.- ही लस वापरल्यानंतर देखील क्वचितच काही जनावरात सौम्य प्रमाणात या रोगाची लागण झाल्याचे आढळून येते.- मुळातच हा विषाणूजन्य रोग असल्यामुळे वेगवेगळ्या तीव्रतेचे आजार निर्माण होतात. काही ठिकाणी सौम्य तर काही ठिकाणी तीव्र लक्षणे दिसतात.- तथापि जर लसीकरण केले असेल तर काही जनावरे सौम्य लक्षणे दाखवू शकतात पण ती अल्पशा उपचाराने तात्काळ बरी देखील होतात.- त्यामुळे पशुपालकांनी लसीकरण न टाळता लसीकरण करून घ्यावे. आपल्या जिल्ह्यात मागील वर्षी साधारण ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता.- त्यामुळे जून जुलैमध्ये या रोगाविरुद्ध नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून लसीकरण करून घ्यावे आणि आपले पशुधन या रोगापासून वाचवावे.
डॉ. व्यंकटराव घोरपडेसेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली
अधिक वाचा: शेळ्या-मेंढ्यातील आंत्रविषार प्राण घातक ठरू शकतो, वेळीच करा उपाय