राज्याच्या अनेक भागात सध्या मोठ्या प्रमाणावर लंपीच्या साथीत वाढ दिसून येत आहे. वातावरणातील वाढलेले मच्छर आणि ढगाळ हवामानामुळे गोठ्यात अधिक प्रमाणात वाढलेले गोचीड, पिसवा आदींचा प्रादुर्भावामुळे लंपी त्वचा रोगाचा प्रसार अतिजलद होत आहे.
यामुळे पशुपालकांनी आपल्या गुरांना लंपीची बाधा झाली असल्यास त्वरित जवळच्या पशूवैद्यकांची मदत घेणे आवश्यक आहे. यासोबतच, खालील उपाययोजनांचा अवलंब करून पशुपालक या साथीच्या आजारावर आळा घालू शकतात.
यामध्ये योग्य लस देणे, गोठ्याची स्वच्छता राखणे आणि गुरांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे यांचा समावेश आहे. लंपीची लवकर निदान आणि योग्य उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
लक्षणे
- जनावरांना खूप (१०५ अंश फे.) ताप येतो.
- जनावरांच्या नाकातून, तोंडातून, डोळयातून पाणी येते.
- डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात. त्यामुळे दृष्टीवर देखील परिणाम जाणवतो.
- तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो.
- चारा खाण्याचे प्रमाण व पाणी पिण्याचे कमी होते. यामुळे दुध उत्पादनात घट येते.
- जनावराच्या अंगावर कडक आणि गोल आकाराच्या दहा ते पन्नास मिलिमीटर व्यासाच्या गाठी येऊन त्यावर खपल्या पडतात. खपली गळून पडल्यानंतर जवळजवळ एक महिण्यापर्यंत तो विषाणू तेथेच राहतो.
- हा विषाणू संक्रमण झाल्यापासून १ ते २ आठवड्यापर्यंत त्या जनावराच्या रक्तामध्येच राहतो आणि त्यानंतर इतर भागांमध्ये संक्रमित होतो.
- लसिकाग्रंथीना सूज येते. पायावर सूज येऊन काही वेळेस जनावर लंगडते.
- त्वचेत तसेच त्वचेखाली पायावर, पोळीवर, मानाखाली, सूज येते.
- त्याच्या प्रजनन क्षमतेवर देखील परिणाम होतो.
- गाभण जनावरामध्ये या रोगाची लागण झाल्यास गर्भपात होण्याची शक्यता असते.
- वासरू जन्मल्यास अशक्त वासरू जन्मास येते.
प्रसार : या रोगाचा प्रसार हा विविध किटकांमार्फात होतो त्यामुळे गोचीड, पिसवा तसेच किटकवर्गीय माशा यांचा बंदोबस्त करणे खूपच गरजेचे आहे.
गोचीड : गोचीडाची मादी रक्त पिल्यानंतर जनावराच्या अंगावरून खाली पडते व अंधाऱ्या जागी, गव्हानिच्या खाली भेगा, कपारी असतील तेथे त्या मध्ये अंडी घालते. यामुळे गोठ्याची स्वच्छता करून अंडी जमा करून जाळून नष्ट करावीत, किंवा फ्लेमगनच्या मदतीने गोठ्याचा पृष्ठभाग जाळून घ्यावा. जनावराच्या शरीरावर तसेच गोठ्यात वनस्पतीजन्य किटकनाशकाची फवारणी करावी.
पिसवा : पिसवा स्वत:ची अंडी हि परिसरात तसेच आडूला/छताला लागलेले जाळे, जळ माटे यामध्ये घालते. यासाठी सभोवतालचा परिसर साफ करून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी मिठाच्या ४% द्रावणाची गोठ्यामध्ये फवारणी करावी. पिसाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास गोठ्यापासून दूर अंतरावर नेऊन काही कालावधीसाठी बांधावे.
किटकवर्गीय माशा
हिमाटोबिया माशी : हि माशी जनावरास आठ्ठेचाळीस वेळा चावते. व ताज्या शेणावर अंडी घालते. त्यामुळे शेणाची योग्य ती विल्हेवाट लावावी. पशुधनाच्या अंगावर वनस्पतीजन्य किंवा रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.
माशी : हि माशी आकाराने मोठी असून गाय व म्हैस यांना प्रखर सूर्यप्रकाशात चावते व तेथे रक्त काढते. त्यामुळे जनावरास प्रखर सूर्यप्रकाशात चारावयास सोडू नये.
स्टोमोक्सीस माशी : हि माशी आपली अंडी मुत्राने ओल्या, खराब झालेल्या वैरणीवर घालते. यासाठी गोठ्यामध्ये उरलेली वैरण शेणाच्या खड्ड्यात/उकिरड्यावर टाकावी. जनावरास प्रखर सूर्यप्रकाशात हि माशी चावते त्यामुळे प्रखर सूर्यप्रकाशात जनावरांना चरावयास सोडू नये.
क्यूलीकवाइड माशा : या प्रकारच्या माशा आपली अंडी हि कपारी, पाणथळ ठिकाणी घालते. यामुळे अंडी घालण्याच्या जागा नष्ट कराव्यात
वनस्पतीजन्य किटकनाशकाचा वापर : निंबोळी तेल १० मिली, करंज तेल १० मिली, निलगिरी तेल १० मिली, साबण चुरा २ ग्राम व पाणी १ लिटर याचे द्रावण व्यवस्थित करून व ढवळून जनावराच्या शरीरावर व गोठ्यात फवारावे. किंवा निंबोळी अर्क ५% द्रावणाची फवारणी देखील करण्यास काहीच हरकत नाही.
काळजी : लंपी हा त्वचा रोग येऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्याची गरज आहे. रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये म्हणून पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.
१) रोगाची लक्षणे आढळल्याबरोबर पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडूनच जनावराची तपासणी करून घ्यावी.
२) गोठ्यात गायी व म्हशींना एकत्रित बांधू नये.
३) निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.
४) रोगाचा प्रसार किटकामार्फत होत असल्यामुळे किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.
५) परिसरात स्वच्छता राखावी व निर्जंतुक द्रावणाने परिसरात फवारणी करावी.
६) फवारणीसाठी १ टक्के फॉर्मलीन किंवा २ ते ३ टक्के सोडियम हायपोक्लोराईड, फिनॉल २ टक्के यांचा वापर करावा.
७) हा आजार होऊ नये म्हणून ज्या बाजारातून जनावरांची खरेदी विक्री होते तो बाजार बंद ठेवला पाहिजे.
८) जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता तसेच चारा खाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी.
९) जनावराचा या रोगाने मृत्यू झाल्यास कमीत कमी ८ फूट खोल करून त्यात खाली व वर चुन्याची पावडर टाकून विल्हेवाट लावावी.
लसीकरण : यावरील रोगाची लस हि उत्तर प्रदेशातील बरेली मधील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेच्या व भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या हिस्सार, हरियाणा येथील राष्ट्रीय इक्वीन रिसर्च सेंटर अंतर्गत असलेल्या दोन संस्थांनी लस विकसित केली आहे. लंपी त्वचा आजारावर आता 'लंपी प्रो वॅक्सीन' हि स्वदेशी लस उपलब्ध झाली आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते या लसीचा शुभारंभ करण्यात आला. यामुळं पशुपालकांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. विशेषत: राजस्थानमधील पशुपालकांना हा मोठा दिलासा आहे.
राजस्थानमध्ये याचा मोठा फैलाव झाल्याने तिथे मोठ्या प्रमाणावर जनावरे दगावली आहेत. गायींनंतर हा आजार म्हशींमध्येही पसरणे सुरु झाले होते. मात्र, आता लस आली आहे. या लसीला "लंपी प्रो वॅक्सीन" असे नाव देण्यात आले आहे. या लसीची प्रतिकारक क्षमता १ वर्ष असणार आहे. आजपर्यंत आपण यावर ठोस असा उपचार नव्हता म्हणून आपण गोट पोक्ष हि लस देत होतो कारण हा विषाणू संसर्गजण्य असून तो poxviridae यावंशातील कॅप्रीपॉक्स virus या पोटजातीतील लम्पीस्कीन विषाणूशी मिळताजुळता होता.
लसीकरणकरतानायागोष्टीलक्षात ठेवा
- वयाच्या ४ महिन्यावरील जनावराना लसीकरण करावे.
- लस हि थंड तापमानाला म्हणजेच ४-८ अंश से. तापमानावर ठेवावी.
- लसीकरण करत असताना प्रत्येवेळी हि सुई बदलली गेली पाहिजे.
- आजारी जनावराना लस देवू नये.
- या रोगाचा प्रादुर्भाव जेथे झालेला आहे त्या स्थळापासून ५ किलोमीटर त्रीजेच्या परिसरातील जनावरांचे लसीकरण करावे.
फवारणीकरतअसतानाकोणतीकाळजीघ्यावी
- फवारणी करण्यापूर्वी जनावरास भरपूर पाणी पाजावे.
- जनावरांना उघड्या मैदानावर नेऊन फवारणी करावी आणि जोपर्यंत शरीरावरील पाणी सुकत नाही तोपर्यंत तिथेच थांबावे.
- फवारणी नंतर जनावराने अंगावर चाटू नये म्हणून ते सुके पर्यंत तोंडाला मुसक किंवा मुंगसे बांधावे.
- वापरलेले कीटकनाशकाचे डब्बे इकडे तिकडे फेकून देऊ नयेत जर फेकले असतील तर ते गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी नसता जनावराने जर ते चाटले तर विषबाधा होण्याची शक्यता असते.
- वापरलेली भांडी, पाणी पिण्यासाठी जनावरांना वापरू नये. या रोगाचा जास्त प्रसार होऊ नये म्हणून जिथे हा आजार आढळला त्या परिसरातील पाच किलोमीटरच्या परिघामधील पशुधनाचे लसीकरण करणे गरजेचे आहे.
प्रा. के. एल जगताप
विषय विशेषज्ञ, पशूसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग
प्रा. दिप्ती चिं पाटगावकर
कार्यक्रम समन्वयक
कृषि विज्ञान केंद्र, खामगाव, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.