नीरा : मागील सहा महिन्यांपासून खासगी व सहकारी दूध संघाने शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरांत तब्बल ११ रुपयांनी घसरले आहेत. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावत आहे.
दुग्धव्यवसाय हा ग्रामीण अर्थकारणासाठी महत्त्वाचा घटक आहे. तथापि दुधास योग्य भाव मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत येत असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांस दुधाचा उत्पादन खर्चदेखील सुटत नाही. पूर्वी शेतीला जोड धंदा म्हणून शेतकरी दूध व्यवसायाकडे पाहत होता. मात्र मध्यंतरी वाढलेल्या दरांमुळे तरुणवर्ग दूध व्यवसायाकडे वळला आहे.
पशुखाद्याचे दरात दिवसेंदिवस वाढ
■ मागील सहा महिन्यांपासून, दुधाचे दर घसरण्यास सुरुवात झाली आहे. ऐन थंडीच्या सुरुवातीलाच दुधाच्या दरात तब्बल ११ रुपयांनी घसरण झाली असून, त्याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होणार आहे, तर दुसरीकडे मात्र, पशुखाद्याचे दर दिवसेंदिवस वाढत असताना, सणासुदीच्या काळात दुधाचे वाढलेले दर दुधाला चांगली मागणी असतानाही कमी होत असल्याने, याचा फटका मात्र, शेतकऱ्यांना बसणार आहे.
■ उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच दुधाला प्रतिलिटर ३८ रुपये दर मिळाला होता. यामुळे तरुणाई दूध व्यवसायाकडे आकर्षित होत होती. यामुळेच अनेक तरुणांनी बँकेचे, पतसंस्थेचे कर्ज घेऊन अनेक तरुण वर्ग या व्यवसायात गुंतला आहे.
■ सध्या दुधाची खरेदी २७ रुपये लिटरने केली जात आहे. यामुळे तरुण वर्गाला मोठा आर्थिक फटका या दूध दर कपातीमुळे होणार असून, यामुळे दूध व्यवसायात नव्याने आलेल्या तरुण वर्ग कर्जाच्या विळख्यात अडकणार असल्याची भीती व्यक्त करीत आहेत.
■ दूध व दुग्धजन्य पदार्थाना वाढती मागणी असूनही तसेच, थंडीमध्ये साधारण १० टक्के दूध उत्पादनात घट होत असूनही, तरीही खासगी व सहकारी दूध संघानी दूध खरेदी दर कमी केल्याने, शेतकऱ्यासमोर दुहेरी संकट निर्माण झाले आहे.
दूध संघानी दूध खरेदी दरांत मागील सहा महिन्यांपासून तब्बल ११ रुपये रुपयांनी घट केली असून, यामुळे शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडत आहेत. शासनाने दूध खरेदी दरात वाढ करून, दूध व्यवसाय वाचवावा.- निखिल निगडे, डेअरीचालक
पुरंदर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीत निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करणे जिकिरीचे काम झाले असून, शासनाने तत्काळ चारा छावण्या सुरू करून, शेतकरीवर्गाचे पशुधन वाचवावे.- दीपक भोसले, दूध व्यावसायिक, झिरिपवस्ती
दुधव्यवसाय हा ग्रामीण अर्थकारणासाठी महत्त्वाचा घटक आहे. तथापि, दुधास योग्य भाव मिळत नसल्याने, दूध उत्पादक शेतकरी अडचणीत असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांस दुधाचा उत्पादन खर्चदेखील सुटत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला असून सतत होणाऱ्या तोट्यामुळे दूध व्यवसाय बंद करण्याच्या मनःस्थितीत दूध व्यावसायिक आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यासाठी दुधाला हमीभाव व अनुदान द्यावे. - किरण निगडे, दूध उत्पादक शेतकरी