Join us

'...तर तहसील कार्यालयासमोर जनावरे बांधणार'; दूध दरावरून आंदोलकांचा इशारा

By दत्ता लवांडे | Published: November 27, 2023 8:07 PM

मागच्या एका महिन्यापासून दूध दराचा प्रश्न प्रलंबित असून आंदोलक आणि शेतकरी आपल्या मागणीवर ठाम आहेत.

मागच्या एका महिन्यापासून दूध दराचा प्रश्न प्रलंबित असून आंदोलक आणि शेतकरी आपल्या मागणीवर ठाम आहेत. खासगी आणि सहकारी दूध संघाकडून शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन होत नसून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. जुलै महिन्यात सरकारने काढलेल्या आदेशानुसार ३४ रूपये प्रतिलीटर दर देण्यास सरकारी बैठकीत या संघांनी नकार दिल्यामुळे संघावर नियंत्रण कुणाचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. एका महिन्यानंतरही या प्रश्नावर तोडगा निघाला नसल्याने अकोले तालुक्यातील आंदोलकांकडून मागच्या ४ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. 

दरम्यान, दूध दर आंदोलनाच्या अनुषंगाने २२ नोव्हेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृहावर दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शेतकरी, दूध संघाचे प्रतिनिधी आणि आंदोलक यांच्यामध्ये बैठक झाली होती. जुलै महिन्यात समितीने दिलेल्या अहवालानंतर सरकारने काढलेल्या आदेशानुसार ३४ रूपये प्रतिलीटर एवढा दर दुधाला देण्यात यावा अशी मागणी आंदोलकांची होती पण ती मागणी संघांकडून थेट अमान्य केली गेली, त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले आहेत. 

गेल्या 4 दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील दूध उत्पादक शेतकरी श्री. संदीप दराडे व  अंकुश शेटे हे आमरण उपोषणास बसले आहेत. 4 दिवस उलटून गेल्यानंतरही सरकारने उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनीही या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली आहे. आज उपोषणाचा पाचवा दिवस असून तातडीने निर्णय झाला नाही तर तहसील कार्यालयासमोर जनावरे बांधणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. 

ग्रामपंचायती आणि दूध संकलन केंद्रांनीसुद्धा ठराव करून या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. युवक क्रांती दलाकडूनही कर्जत ते अहमदनगर असा किटली मोर्चा काढत या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. दुधाचे दर कमी करण्याच्या मागणीचे निवेदन शेतकरी आणि युवक क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

काय आहेत आंदोलकांच्या मागण्या?दुधाला शासन निर्णयाप्रमाणे 34 रुपये भाव जोवर मिळत नाही व दुध भेसळ, वजन व मिल्कोमीटर काटमारी, खाजगी संस्थांना लागू असणारा कायदा या प्रश्नावर कार्यवाही केली जात नाही तोपर्यंत उपोषण चालूच ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय.

दूध दराचा नेमका प्रश्न काय आहे?दुधाचे घसरते दर आणि त्यामुळे दूध उत्पादकांचे होणारे आंदोलन यासाठी शासनाने दुधाचा उत्पादन खर्च आणि शेतकऱ्यांच्या दुधाचा दर ठरविण्यासाठी एक समिती नेमली होती. त्या समितीच्या अहवालानंतर शासनाने दुधाला ३४ रूपये प्रतिलीटर दर देण्याचा आदेश काढला होता. पण प्रत्येक तीन महिन्याला समितीने नवा अहवाल देणे आणि त्यानुसार दरामध्ये चढउतार होईल असंही शासनाने त्यामध्ये म्हटलं होतं.

पण शासनाने आदेश काढल्यानंतर काही दिवसांतच दुधाचे दर पडले. ३४ रूपयांवरून थेट २४ ते २६ रूपयांवर दर आल्याने शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. तर शासनाने काढलेला आदेश दूध संघांकडून पाळजे जात नसल्यामुळे या दूध संघांवर कुणाचा वरदहस्त आहे का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रदूधशेतकरीसंप