कोल्हापूर : दक्षिणेकडील राज्यांतील दूध उत्पादनात वाढ झाल्याने देशांतर्गत बाजारपेठेत गाय बटर व पावडरच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे राज्यातील खासगी दूध संघांनी शनिवारपासून गाय दूध खरेदी दरात एक ते दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील 'गोकुळ', 'वारणा', 'राजारामबापू' या सहकारी दूध संघांचे दर मात्र जैसे थे राहणार आहेत. राज्यात गायीचे दूध अतिरिक्त झाल्याने डिसेंबरपासून गाय दूध खरेदी दरात कपात केली आहे. खासगी दूध संघाकडून तर २५ ते २८ रुपये प्रतिलिटरने दूध खरेदी केले जाते.
थंडी जाऊन उन्हाळा आल्यानंतर दुधाची मागणी वाढेल आणि दर सुधारतील, अशी अपेक्षा होती. पण, उन्हाळा संपून पावसाळा आला तरी दुधाची मागणी आहे तेवढीच आहे. तरीही मध्यंतरी गाय दूध पावडर व बटरच्या दरात थोडी वाढ झाली होती.
तोपर्यंत कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यांत दूध उत्पादन वाढू लागल्याने राज्यातील खासगी दूध संघांनी दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापुरात 'गोकुळ', 'वारणा' व सांगलीत 'राजारामबापू' यासह इतर सहकारी दूध संघांचे दर पूर्वीप्रमाणेच स्थिर राहणार आहेत.
कर्नाटक फेडरेशनच्या संकलनात वाढ
दक्षिणेकडील सर्वच राज्यांत दूध संकलन वाढू लागले आहे. कर्नाटक राज्य दूध फेडरेशनच्या संकलनात गेल्या आठवड्यात चार ते पाच लाख लिटरने वाढ झाली आहे.
अधिक वाचा: Gokul Milk; म्हैस दूध वाढीसाठी गोकुळ घेऊन येतंय ही नवीन योजना